‘हृदयांतर’ चित्रपटाचा मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर
By Admin | Published: July 2, 2017 05:12 AM2017-07-02T05:12:02+5:302017-07-02T05:12:02+5:30
विक्रम फडणीसदिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (कऋऋट)साठी झाली आहे.
विक्रम फडणीसदिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (कऋऋट)साठी झाली आहे. १० ते २२ आॅगस्ट २०१७ दरम्यान मेलबर्नमध्ये आयोजित होणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलद्वारे हृदयांतरचा वल्ड प्रीमियर होणार आहे. हृदयांतरद्वारे विक्रम फडणीस दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. या कौटुंबिक भावनिक चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसतील. मेलबर्नला होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विक्रम फडणीस आपला चित्रपट प्रस्तुत करणार आहेत. तसेच, आपला फॅशन डिझाइनर ते फिल्ममेकर हा प्रवास ‘कॅटवॉक टू सिनेमा’ या मास्टरक्लासद्वारे चित्रपट रसिकांसमोर मांडतील. या सन्मानाने आनंदित झालेले विक्रम फडणीस प्रतिक्रिया देताना सांगतात, ‘हृदयांतर चित्रपटाला अशा पद्धतीने एक जागतिक व्यासपीठ मिळणे हा आमचा सन्मानच आहे. आॅस्ट्रेलियातल्या सिनेरसिकांसमोर आणि मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये माझ्या सिनेमाचे सादरीकरण करण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्यासारखा एखादा नवोदित फिल्ममेकर यापेक्षा अधिक काय मागू शकेल?’ या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे यांच्याशिवाय तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य, अमित खेडेकर आणि मीना नाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.