हर्ष राजपूतसाठी ही गोष्ट नवीन नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 11:58 AM2018-10-22T11:58:30+5:302018-10-22T11:59:13+5:30
हर्ष राजपूत अंश राठोडची भूमिका करत असून त्याच्या ह्या वेगळ्या भूमिकेमुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळत आहे.
अमानवी शक्तींच्या विषयावर आधारित असलेल्या या मालिकेची कथा मुंबईसारख्या महानगरीत घडते. अमानवी शक्ती आणि त्यांची माणसावर पडणारी वाईट दृष्टी हा या मालिकेच्या कथानकाचा विषय आहे. हर्ष राजपूत अंश राठोडची भूमिका करत असून त्याच्या ह्या वेगळ्या भूमिकेमुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळत आहे. 'नजर' या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखवण्यात आले आहे. स्टंट प्रसंग साकारणे ही हर्ष राजपूतसाठी नवी गोष्ट नसून त्याने ते पूर्वीही मालिकांमध्ये साकारले आहेत. ‘नजर’ मालिकेत अंश राठोड या दावंशची भूमिका साकरताना त्याला काही गुंतागुंतीचे प्रसंग साकारावे लागले होते. आता मालिकेच्या निर्मात्यांनी मालिकेतील स्टंटप्रसंग अधिक थरारक करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार अंशला मोहोना (मोनालिसा) या डायनशी दोन हात करावे लागणार आहेत.
मालिकेतील या अमानवी शक्तींमधील संघर्षासाठी हर्षला काही धोकादायक स्टंटप्रसंग उभे करावे लागले. यासंदर्भात तो सांगतो, “सिनेमात हाणामारी करणारा नायक व्हायचं माझं स्वप्न लहानपणापासून होतं आणि आता ‘नजर’ मालिकेत मला ते पूर्ण करता आलं. मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना या डायनविरोधात अंशला दोन हात करताना आजवर कधी न पाहिलेले थरारक अॅक्शनप्रसंग पाहण्याची संधी मिळेल.
या अॅक्शनप्रसंगांसाठी वेगळं तंत्र अवलंबवावं लागलं असून हे प्रसंग एकाच टेकमध्ये पार पाडायचे होते. त्यामुळे मला काखेत दोर अडकवून चार तास हवेत लटकावं लागलं आणि हे अॅक्शनप्रसंग साकारावे लागले होते. तसंच या प्रसंगात मला कोलांट्याउड्या माराव्या लागल्या, जमिनीवर लोळण घ्यावी लागली आणि चेह-यावरही बुक्के मारावे लागले. हे प्रसंग साकारणं हे आव्हानात्मक नक्कीच होतं, पण नायकाला क्वचितच असे थरारक अॅक्शन प्रसंग रंगविण्याची संधी मिळत असते.
त्यामुळेच ते प्रसंग साकारताना मला मनातून खूपच उत्साह वाटत होता. आता प्रेक्षकांनाही ते पाहायला नक्कीच मजा येईल, अशी आशा करतो.” ‘नजर’च्या आगामी भागांमध्ये असे अभूतपूर्व अॅक्शनप्रसंग पाहायला मिळाल्यावर प्रेक्षकांसाठीही ती मनोरंजनाची पर्वणी ठरेल.