रवींद्र महाजनींच्या लेकीला पाहिलंत का?, गश्मीर तिला मानतो दुसरी आई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 05:46 PM2023-07-17T17:46:52+5:302023-07-17T17:47:21+5:30
Ravindra Mahajani : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचे नुकतेच निधन झाले. शुक्रवारी(१४ जुलै) संध्याकाळी राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे नुकतेच निधन झाले. शुक्रवारी(१४ जुलै) संध्याकाळी राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मुलगा गश्मीरने त्यांना अग्नी दिला. यावेळी मराठी सिनेइंडस्ट्रीतील काही मोजके कलाकार उपस्थित होते. रविंद्र महाजनी यांना अखेरचा निरोप देताना पत्नी माधवी भावुक झाल्या होत्या. गश्मीरची पत्नी गौरी सुद्धा यावेळी उपस्थित होती.
रविंद्र महाजनी आणि माधवी यांना दोन मुले आहेत. मुलगा गश्मीर आणि थोरली लेक रश्मी. रश्मीचे लग्न झाले असून ती सध्या कुटुंबासोबत बंगळुरुला स्थायिक आहे. रश्मी आणि गश्मीर यांच्यात १३ वर्षांचे अंतर आहे. गश्मीरसाठी ती दुसरी आईच आहे. या दोघा बहीण भावाचे खूप छान बॉडिंग आहे. काही वर्षांपूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीसाठी गश्मीरने एक खास पोस्ट लिहिली होती.
गश्मीरने म्हटले होते की, माझी बहीण माझ्याहून १३ वर्षांनी मोठी. माझी छोटी आईच ती! केजीपासून ते पाचवी पर्यंत माझा डब्बा भरणे, मला शाळेसाठी तयार करणे, मला तिच्या कायनेटिक होंडा वरुन शाळेत सोडणे तिनेच केले. हिरो होण्याकरता मला सिनेसृष्टीत येण्याची गरज नव्हती. जन्मापासूनच मी तिचा स्टार होतो. माझ्या चित्रपटांना यश मिळो वा न मिळो, माझी एक फॅन निश्चितच माझ्या पाठीशी कायम उभी असेल…. कारण तिचं प्रेम आणि तिची निष्ठा परिस्थितीनुसार बदलत नाही. म्हणूनच नैराश्य माझ्या आसपासही भटकत नाही. स्वामी म्हणतात “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” .. अर्थात, ते कुणाच्या रुपाने माझ्या पाठीशी उभे आहेत हे तुम्हाला समजलेच असेल.
गश्मीरचे वडिलांसोबत काही वाद असतील पण त्यांच्या इतका देखणा मी मुळीच नाही असे कौतुकाचे शब्द त्याने वडीलांबद्दल म्हटले होते. आई, बहीण आणि पत्नी ही तीन नावे माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे माझ्या नावापुढे ही नावे असली की त्यातूनच माझी ओळख बनते असे तो सांगतो.