पिता-पुत्राची हृदयस्पर्शी कथा

By Admin | Published: April 8, 2017 03:31 AM2017-04-08T03:31:47+5:302017-04-08T03:31:47+5:30

दिग्दर्शक सुभाशीष भूटीयानी दिग्दर्शित ‘मुक्तिभवन’ हा सिनेमा आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला.

Heart-warming story of father-son | पिता-पुत्राची हृदयस्पर्शी कथा

पिता-पुत्राची हृदयस्पर्शी कथा

googlenewsNext


जान्हवी सामंत
दिग्दर्शक सुभाशीष भूटीयानी दिग्दर्शित ‘मुक्तिभवन’ हा सिनेमा आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. नात्यांसोबत मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या या चित्रपटात एका पिता-पुत्राची कथा दाखवली गेली आहे.
निश्चितपणे ‘मुक्तिभवन’ हा टिपिकल बॉलिवूड चित्रपटांच्या यादीत मोडणारा सिनेमा नाही़ एक मध्यम वयाचा आदिल हुसैन हा अभिनेता यात लीड रोलमध्ये आहे आणि त्यापेक्षा अधिक वयाचा ललित बहल हा अभिनेता साहाय्यक भूमिकेत आहे, पिता दया (ललित बहल) आणि त्याचा मुलगा राजीव (आदिल हुसैन) यांच्यातील मृत्यूच्या संदर्भाने बदलणारे नाते आणि या नात्यातील चढ-उतार यात दर्शवले आहेत.
आपला मृत्यू जवळ आलाय, असे दयाला वाटत असते. वृद्धापकाळात कुटुंबात एकाकी पडलेल्या दयाची एकच अंतिम इच्छा असते ती म्हणजे काशी दर्शनाची. काशीदर्शन करावे आणि याच ठिकाणी अखेरचा श्वास घ्यावा, असे त्याला वाटत असते. अर्थात त्याच्या या निर्णयाला कुटुंबाचा विरोध असतो. कारण दया काशीला गेलाच तर कुटुंबाचे अख्खे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता असते. पण तरीही मुलीचे लग्न ठरलेले असताना, शिवाय नोकरीच्या ठिकाणी कामाचा डोंगर असताना राजीव वडिलांच्या इच्छेखातर त्यांच्यासोबत काशीच्या यात्रेला निघतो. काशीच्या ‘मुक्तिभवना’त त्यांना १५ दिवसांचा आश्रय मिळतो. पण इथे पोहोचल्यावर राजीव कर्तव्य की जबाबदारी अशा वेगळ्याच जाळ्यात अडकतो. मुक्तिभवनात राहून मृत्यूची प्रतीक्षा करणारे वृद्ध आणि या वृद्धांना लवकर मृत्यू यावा, असा विचार करणारे त्यांचे नातेवाईक यांच्याकडे पाहून बनारस एक वेगळेच जग असल्याचा साक्षात्कार राजीवला होतो़ पण कर्तव्य आणि जबाबदारी याचे संतुलन साधता साधता तो मेताकुटीला येतो. याचदरम्यान मुक्तिभवनात मृत्यूची प्रतीक्षा करणाऱ्या राजीवच्या पित्याची तब्येत बिघडते. पित्याला मुक्ती मिळेल आणि आपण घरी परतू शकू, असे राजीवला वाटत असतानाच त्यांची तब्येत पुन्हा सुधारू लागते. मृत्यू बोलवल्याने येत नाही, हे तोपर्यंत दयाला कळून चुकते़ याच वळणावर तो राजीवला घरी पाठवत स्वत: ‘मुक्तिभवना’त एकट्याने राहण्याचा निर्णय घेतो.
आदिलने या चित्रपटात कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची भूमिका साकारली आहे. याउलट पित्याच्या भूमिकेत ललित बहलने एक ‘सठियां हुआ बुड्ढा’ असे उत्कृष्ट पात्र रंगवले आहे़ सतत मागणी करणारा, लहान मुलाप्रमाणे सतत कुटुंबाचे लक्ष स्वत:कडे वेधू पाहणारा पण काही प्रसंगी अतिशय परिपक्व आणि आश्वस्त अशा पित्याची भूमिका ललित बहलने साकारली आहे.
पिता-पुत्राच्या नात्यातील अनेक कंगोरे दाखवणारा हा चित्रपट याच वाटेने पुढे जात असताना या दोघांना आपल्या नात्याचा वेगळाच धागा गवसतो, असे याचे कथानक आहे. या चित्रपटाचे सगळ्यात मोठे श्रेय दिग्दर्शकाला द्यावे लागेल़ मानवी स्वभाव आणि नात्यांमधील अगदी लहानसहान गोष्टी त्याने अगदी तंतोतंत टिपल्या आहेत. त्याच्या याच निरीक्षणाच्या जोरावर हा चित्रपट अधिक आकर्षक झाला आहे. माणसाचे वाढते वय, जीवन आणि मृत्यू ही अंतिम सत्ये आहेत. दिग्दर्शकाने ही सत्ये तितक्याच प्रामाणिकपणे दाखवण्याचे प्रयत्न केले आहेत.
‘मुक्तिभवन’ हा बॉलिवूडच्या मसाला चित्रपटांच्या कक्षेतील नसला तरी पाहण्याजोगा आहे. हेच याचे यश आहे.

Web Title: Heart-warming story of father-son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.