स्वत्वाच्या प्रवासाचा ‘हायवे’

By Admin | Published: August 23, 2015 03:55 AM2015-08-23T03:55:59+5:302015-08-23T03:55:59+5:30

प्रवास हा माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मग तो जीवनाचा असो, शैक्षणिक असो, करिअरचा असो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारा असो किंवा ‘हायवे’वरचा असो.

Highway Travel | स्वत्वाच्या प्रवासाचा ‘हायवे’

स्वत्वाच्या प्रवासाचा ‘हायवे’

googlenewsNext

प्रवास हा माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मग तो जीवनाचा असो, शैक्षणिक असो, करिअरचा असो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारा असो किंवा ‘हायवे’वरचा असो. प्रवास हा कोणालाच चुकलेला नाही. पण या सगळ्याव्यतिरिक्त स्वत:चे आणि स्वत:बरोबर दुसऱ्यांचा विचार करायला लावून मानसिक आणि भावनिक बदल घडवणारा विचार हादेखील एक प्रवासच असतो. हा मानसिक आणि भावनिक प्रवासही एका ठिकाणाहून सुरू होतो. कधी त्याला शेवट सापडतो तर कधी तो मध्येच कुठे तरी हरवूनही जातो. त्यामुळे एकीकडे आपण त्याला एखाद्या लहान गावातील फेरफटका म्हणू शकतो तर दुसरीकडे विचारांच्या प्रवासाला शेवट सापडणारा, पण त्या विचाराचे कायम अस्तित्त्व असणारा ‘हायवे’ असतो.
रोजच्या जीवनात प्रवास करणारे, वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे, निरनिराळ्या प्रसंगातून आलेले लोक एकाच गाडीतून प्रवास करतात, त्या वेळी त्यांच्यात होणारे संभाषण, समोरच्याचा स्वभाव समजून घेताना स्वत:ची त्याच्याशी केली जाणारी तुलना असा काहीसा प्रवास ‘हायवे - एक सेल्फी आरपार’ हा चित्रपट आपल्यासमोर उलगडतो. येत्या २८ आॅगस्टला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त या चित्रपटाचे दिग्दर्शक
उमेश कुलकर्णी, लेखक व अभिनेता
गिरीश कुलकर्णी, निर्माते विनय गानू, अभिनेत्री रेणुका शहाणे, दिग्दर्शक व अभिनेता नागराज मंजुळे, वृषाली कुलकर्णी, श्रीकांत यादव आदी कलाकारांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली.
याशिवाय प्रत्येक शॉटमधील एकसंधता दाखवण्यासाठी प्रकाश ही मोठी समस्या होती. लाइट चेंज झाल्यावरही कट केलेला शॉट जोडला असता तर ते खोटे वाटले असते आणि या सगळ्यासोबत रस्त्यावरच्या वाहनांच्या वेगाने चित्रपटाची सलगता टिकवणे हे खरोखरीच जिकिरीचे काम होते.

हुमा कुरेशी आणि टिस्का चोप्राच्या निवडीबद्दल सांगताना उमेश कुलकर्णी म्हणाले, या चित्रपटातील पात्रांचं जगणं बहुआयामी आहे, त्यामुळे एकाच पठडीतील अभिनेते नको होते. हुमा कुरेशीने ‘गँग्स आॅफ वासेपूर’मध्ये केलेले काम खूप भावले होते. ती काम करेल की नाही असे वाटले होते. पण ‘विहीर’ पाहिल्यानंतर तिने स्वत:हून काम करायची उत्सुकता दाखवली. टिस्का चोप्राने ‘तारे जमीं पर’, ‘किरदार’ अशा चित्रपटांमधून खूप सहजसुंदर अभिनय केला आहे. त्यामुळे ही भूमिकादेखील ती सहजपणे करेल असे वाटले.

लेखक गिरीश कुलकर्णी सांगतात, हा चित्रपट एखाद्या विशिष्ट कथानकावर आधारित नसून अनेक वेगवेगळे प्रयोग यामध्ये पाहायला मिळतील. माझ्या मते पठडीबाहेरील चित्रपटही प्रेक्षक आता स्वीकारू लागले आहेत आणि ही संख्या निश्चितच वाढेल. ड्रामा, मनोरंजन, रहस्य या सगळ्याच्या पलीकडील हा चित्रपट आहे आणि त्यामुळे इतर चित्रपटांप्रमाणे डोकं बाजूला न ठेवता एक विचार प्रत्येकाच्या मनात रूजवण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या जोडीनेच चित्रपट काय पद्धतीने पाहावा, याचा सरावही हा चित्रपट करायला लावतो. या चित्रपटाला कथा नसली तरी ज्याप्रमाणे रस्त्यावरच्या माणसाला न्याहाळताना स्वत:चे दर्शन हा चित्रपट घडवतो.
रेणुका शहाणे सांगतात, हा चित्रपट म्हणजे एखादा रस्ता दोन शहरांना जोडणारा म्हणजेच कनेक्शनचं प्रतीक आहे, असं मला वाटतं. कारण आज काही कोस दूर असलेली शहरं, गावं हायवेने जोडण्यात माणूस यशस्वी झाला आहे. परंतु माणसं मात्र एकमेकांपासून डिसकनेक्ट होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असा कधीच कोणी विचार न करू शकणाऱ्या विषयावरील हा अत्यंत धाडसी प्रयोग या चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे.
श्रीकांत यादव सांगतात, माझ्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता. इतर वेळेला अभिनय करणाऱ्यांना खूप स्वातंत्र्य असतं. मात्र इथे जागेपासून एक्सप्रेशन्सपर्यंत सगळ्याच गोष्टींवर बंधन असल्याने काम करण्याचं आव्हान होतं. पण हा एक वेगळाच प्रयोग असल्याने हळूहळू त्याचा सराव होत गेला आणि त्याची सवय झाली.

रेणुका शहाणे होत्या म्हणूनच केली भूमिका
चित्रपटाचे लेखक असलेले अभिनेते गिरीश कुलकर्णी म्हणाले, हा चित्रपट लिहिताना रेणुका शहाणे यांना डोळ्यासमोर ठेवूनच मी भूमिका लिहिली. मी साकारलेली भूमिकाही केवळ त्या असल्यानेच केली. अन्यथा मला दुसऱ्या भूमिका खुणावत होत्या.

चित्रपटात ट्रक ड्रायव्हरची भूमिका साकारलेले नागराज मंजुळे सांगतात, दिग्दर्शनाबरोबरच अभिनयाची हौस मला आहेच. पण दोन्ही एका वेळेला जमेल की नाही, याबाबत साशंकता होती, मात्र पर्याय नसल्याने ते मी फॅँड्रीमध्ये साध्य करून दाखवले. या चित्रपटाच्या वेळी उमेश आणि गिरीश कुलकर्णीने तू भूमिका करायची आहेस, असा विनंतीवजा आदेशच दिला. आणि तो मी मानला. यामध्ये ‘ट्रक’देखील माझाच असल्याचे ते मिश्कीलपणे म्हणाले.

Web Title: Highway Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.