कॅन्सरवरील केमोथेरेपीनंतर मालदीव्सला गेली हिना खान, फोटो शेअर करत म्हणाली- "प्रत्येक दिवस..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 11:54 AM2024-10-21T11:54:10+5:302024-10-21T11:54:47+5:30
काही महिन्यांपूर्वीच ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती हिनाने चाहत्यांना दिली होती. सध्या हिना कॅन्सरवर उपचार घेत आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली. या मालिकेतील अक्षराने तिला लोकप्रियता मिळवून दिली. हिना सध्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. काही महिन्यांपूर्वीच ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती हिनाने चाहत्यांना दिली होती. सध्या हिना कॅन्सरवर उपचार घेत आहे.
कॅन्सरशी खंबीरपणे लढा देणारी हिना मालदीव्सला पोहोचली आहे. हिना तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत असते. कॅन्सरवरील उपचाराचे अपडेट्सही ती शेअर करताना दिसते. कॅन्सरमुळे हिनाचं आयुष्य पूर्णपणे बदललं असून तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. हिनाने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. मालदीव्सच्या समुद्रकिनाऱ्यावरील एक सेल्फी हिनाने शेअर केला आहे.
यामध्ये हिनाने डोक्यावर टोपी घातल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत हिना म्हणते, "दिवस कसे पण असू दे, आता मी आयुष्य जगायला शिकले आहे...प्रत्येक दिवस असा जगा की हाच तुमचा शेवटचा दिवस असेल". हिनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. तसंच कमेंट करत तिला लवकर बरे होण्याासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कॅन्सरवरील उपचार म्हणून हिनाची केमोथेरेपी सुरू आहे. या आजाराचा ती खूप धैर्याने सामना करत असून चाहत्यांपुढे आदर्श ठेवत आहे. हिनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. तर अनेक वेब सीरिजमध्येही ती झळकली आहे.