केमोथेरपीमुळे हिना खानच्या पापण्यांवरील केसही झाले विरळ; फोटो शेअर करत दिली हेल्थ अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 08:56 AM2024-10-14T08:56:13+5:302024-10-14T08:58:30+5:30
अभिनेत्री हिना खानने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून तिचे चाहते चिंतेत आहेत.
Hina Khan : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान (Hina Khan ) सध्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. अगदी काही महिन्यापूर्वीच हिनाने तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. हिना खान स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. असं असतानाही अभिनेत्री परिस्थितीसमोर हार मानता ती आयुष्यातील या कठीण संकटाशी पूर्ण धैर्याने लढत आहे. अशातच हिनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सध्या हिनाची शेवटची केमोथेरपी सुरू आहे. यादरम्यान, हिना खानने सोशल मीडियावर तिच्या दोन्ही डोळ्यांचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यापोस्टद्वारे अभिनेत्रीने केमोथेरपीमुळे तिच्या डोळ्यांच्या पापण्या विरळ झाल्या आहेत, असं सांगितलं आहे. शिवाय तिच्या भूवयांचे केस देखील गळत आहेत.
दरम्यान, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हिना म्हणते, "तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? सध्या माझ्या प्रेरणेचा स्त्रोत काय आहे. एक वेळ अशी होती जेव्हा माझ्या डोळ्यांची शोभा या पापण्यामुळे वाढायची. माझ्या डोळ्यांच्या पापण्या अनुवांशिकदृष्ट्या खूप लांब आणि सुंदर होत्या. पण, आता त्या सर्व पापण्यांचे केस केमोथेरपीमुळे तुटू लागले आहेत. त्या विरळ झाल्यात आहेत. आता ही शेवटची पापणी निडरपणे माझ्यासोबत उभी आहे, लढते आहे. या शेवटच्या केमोथेरिपी ट्रिटमेंटमध्ये ही पापणीचं माझं मनोबल वाढवते आहे. माझ्या शेवटच्या केमोथेरिपीमध्ये मला ही पापणीचं प्रेरणा देण्याचं काम करते आहे. असो, या कठीण काळावरही मात करू".
पुढे अभिनेत्री म्हणते, "यापूर्वी शूटिंगदरम्यान मी कधीही आयलॅशेजचा वापर केला नाही. परंतु आता मला शूट करताना आयलॅशेज लावणं भाग पडत आहे. काही नाही सगळं ठीक होईल". असं म्हणत तिने ही भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
हिना खानची ही व्हायरल पोस्ट पाहताच अनेक कलाकार मंडळी त्यावर व्यक्त होताना दिसत आहेत. जुही परमार, स्मृती खन्ना, राखी सावंत तसेच एकता कपूर यांसारख्या सेलिब्रिटी मंडळींनी हिनाच्या पोस्टवर कमेंट करत तिला प्रोत्साहन दिलं आहे.