Oscars 2022 : अँड द ऑस्कर गोज टू...! ‘कोडा’ सर्वोत्कृष्ट चित्रपट, भारताचं स्वप्न मात्र भंगलं...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 10:17 AM2022-03-28T10:17:11+5:302022-03-28T11:46:23+5:30
Oscars 2022 : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘ड्यून’ या चित्रपटाने सर्वाधिक 6 पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.
Oscars 2022 : 94 व्या ऑस्कर अवार्डचा यंदाचा सोहळा रविवारी थाटामाटात पार पडला. कॅलिफोर्नियास्थित लॉस एंजिल्सच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा सुरू झाला आणि यंदाचा ऑस्कर कोण जिंकतो, यावर अख्ख्या जगाच्या नजरा खिळल्या. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘ड्यून’ या चित्रपटाने सर्वाधिक 6 पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. कर्णबधीर कुटुंबाची कथा सांगणारा ‘कोडा’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. यावेळी ‘कोडा’च्या संपूर्ण टीमला स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आलं.
भारताचं ऑस्कर जिंकण्याचं स्वप्न यंदाही भंगलं.
सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत ‘रायटिंग विथ फादर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळालं होतं. मात्र या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आलं. सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत ‘द समर ऑफ सोल’ या माहितीपटानं ऑस्कर जिंकला.
‘ड्यून’ने जिंकले सहा ऑस्कर
‘ड्यून’ या चित्रपटाने 6 ऑस्कर जिंकत बाजी मारली. सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग, सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन, सर्वोत्कृष्ट साऊंड, सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी असे सहा ऑस्कर पुरस्कार ‘ड्यून’ने पटकावलं.
विल स्मिथ ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, जेसिका चेस्टेन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सुपरस्टार विल स्मिथ याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार पटकावला. ‘किंग रिचर्ड’ या चित्रपटासाठी विल स्मिथ याला ऑस्कर देऊन गौरविण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना विल भावुक झालेला दिसला. अभिनेत्री जेसिका चेस्टेन ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या ऑस्कर पुरस्काराची मानकरी ठरली. The Eyes Of Tammy Faye या चित्रपटासाठी तिने ऑस्कर जिंकला.
जेन कॅम्पियन यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर जिंकला. ‘द पॉवर ऑफ द डॉग’ या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट डायरेक्टरचा ऑस्कर देण्यात आला. या श्रेणीत पॉल थॉमस अँडरसन, केनेथ ब्रानाघ, स्टीव्हन स्पीलबर्ग, रूसुके हामागुची यांना नामांकन मिळालं होतं. ट्रॉय कोत्सुर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर देऊन गौरविण्यात आलं. 53 वर्षीय ट्रॉय यांचं ऑस्कर जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. याक्षणी त्यांना अश्रु अनावर झालेत.
जेम्स बाँडच्या 'नो टाइम टू डाय' या गाण्यासाठी बिली एलिशला सर्वोत्कृष्ट मूळ गायकाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळालेला चित्रपट म्हणून जॅक स्नायडरच्या 'आर्मी ऑफ द डेड' ची निवड ऑस्कर पुरस्कारासाठी करण्यात आली.