Amazon Rainforest Fire: 'अॅमेझॉन'साठी बॉलिवूडकर एकवटल्यावर आता हॉलिवूडचा 'हा' स्टार सरसावला मदतीसाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 01:28 PM2019-08-27T13:28:16+5:302019-08-27T13:28:55+5:30
Amazon Forest Fire : अॅमेझॉन जंगल सध्या आगीने धुमसतंय आणि जगभरातून या आगीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
गुढ रहस्यांनी भरलेले अॅमेझॉनचे जंगल नेहमी जगाला खुणावत आले आहे. जगाच्या पाठीवर क्चचित आढळेल अशी जैवविविधता असलेल्या या जगातील सर्वात मोठ्या सदाहरित जंगलाच्या चिंतेने सध्या बॉलिवूडकरांना ग्रासले आहे. होय, या जंगलात लागलेली भीषण आग हे यामागचे कारण आहे. खरे तर याआधीही या जंगलात आगीच्या घटना घडल्या आहेत. पण सध्याची आग इतकी भीषण आहे की, ब्राझिलचे साओ पाउलो धुरामुळे अंधारात डुंबले आहे. अवकाशातूनही धूर दिसतो आहे.
अॅमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वात मोठे वर्षावन आहे. ते मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेते आणि ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी करते. मात्र सध्या हे वर्षावन आगीने धुमसतंय. यामुळेच ट्विटरवर #PrayForTheAmazonहा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सनेही अॅमेझॉनमधील आगीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. इंग्रजी वेबसाईट व्हॅरायटीच्या वृत्तानुसार, आता हॉलिवूड स्टार लिओनार्डो डिकैप्रियोने अॅमेझॉन जंगलाच्या संरक्षणासाठी ५ मिलियन डॉलर म्हणजे ३६ कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
लिओनार्डोने अॅमेझॉन जंगलच्या मदतीसाठी उचललेल्या पावलासाठी त्याचं सोशल मीडियावर खूप कौतूक होत आहे. लिओनार्डोकडून दिला जाणारा निधी पाच स्थानिक संस्थाना दिला जाणार आहे. ही माहितीदेखील खुद्द लिओनार्डो डिकैप्रियोने सोशल मीडियावर दिली आहे.
अॅमेझॉन जंगलला लागलेली आग ब्राझील व बोलिवियानंतर पराग्वेपर्यंत पसरली आहे. आगीमुळे ब्राझीलच्या साओ पाउलो शहरात अंधार पसरला आहे.
आग विझवावी या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. ही आग गेल्या आठ दिवसांत १४ हजार वर्ग किलोमीटरपर्यंत पसरली आहे.