Blonde Trailer: हॉलिवूडची ब्युटी मर्लिन मुनरोच्या आयुष्यावर सिनेमा येतोय...! पाहा, ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 03:45 PM2022-07-29T15:45:48+5:302022-07-29T15:47:23+5:30
Marilyn Monroe, Blonde Trailer: रूपगर्विता मर्लिनचं आयुष्य झगमगाटाने भरलेलं होतं. बाहेरून ती आनंदी दिसत होती. पण तिच्या आनंदाला दु:खाची किनार होती. आता मर्लिन मनरोची हीच शोकांतिका मोठ्या पडद्यावर येणार आहे.
Blonde Trailer: आजही ज्या हॉलिवूड अभिनेत्रीच्या सुंदरतेचे गोडवे गायले जातात त्या मर्लिन मुनरोचे (Marilyn Monroe)आजही लाखों चाहते आहेत. तिचे सिनेमे आजही पुन्हा पुन्हा बघितले जातात. मर्लिन मुनरोने सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच अनेक दिग्गजांवरही जादूच केली होती. रूपगर्विता मर्लिनचं आयुष्य झगमगाटाने भरलेलं होतं. बाहेरून ती आनंदी दिसत होती. पण तिच्या या आनंदाला दु:खाची किनार होती. मर्लिनचे जगभर असंख्य चाहते होते, पण तिच्या आत ठसठसणारं दु:ख कुणालाही दिसलं नाही. आता मर्लिन मनरोची हीच शोकांतिका मोठ्या पडद्यावर येणार आहे. होय, मर्लिनच्या आयुष्यावर बेतलेला ‘ब्लॉन्ड’ हा हॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.
हॉलिवूड अभिनेत्री Ana de Armas ही या चित्रपटात मर्लिन मुनरोची भूमिका साकारताना दिसणार आहे.
जॉईस कॅरोल ओट्स यांनी 2000 साली लिहिलेल्या ‘ब्लॉन्ड’ या चरित्रावर आधारित चित्रपट त्याच नावाने प्रदर्शित होणार आहे. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात मर्लिनच्या करिअरची डार्क साईड दाखवली आहे. ‘मर्लिन या जगात नाहीच मुळी... कॅमेरा बंद झाला की, फक्त नॉर्मा जीन मागे उरले,’ असं एक वाक्य ट्रेलरमध्ये आहे आणि ते पुरेसं बोलकं आहे.
मर्लिन मुनरोला जाऊन आता साठ वर्ष होतील, पण तिच्याबद्दलचं आकर्षण, तिच्या आयुष्याबद्दलचं गूढ आजही कायम आहे. तिच्या मादक सौंदयार्ला कारुण्याची झालर होती. बारा वर्षांच्या हॉलिवूड करिअरमध्ये तिने तब्बल 33 चित्रपटांमध्ये काम केलं. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी ती जगाला अलविदा म्हणत निघून गेली. मर्लिन मुनरोचा मृत्यू झोपेच्या गोळ्यांचा डोस जास्त घेतल्याने झाला होता. पण त्या मागचं कारण आजही समोर येऊ शकलं नाही. तिने आत्महत्या केली की तिचा खून झाला, हे अजूनही रहस्य आहे.
लॉस एंजलिसमध्ये आलेली एक अनाथ मुलगी ते जगात गाजलेली अभिनेत्री हा मर्लिनचा प्रवास आणि तिचा दु:खद शेवट असा सगळा पट ‘ब्लॉन्ड’मध्ये उलगडणार आहे.
‘ब्लॉन्ड’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर येत्या 28 सप्टेंबरला रिलीज होतोय. पन्नास आणि साठच्या दशकातलं हॉलिवूड, त्याकाळात मर्लिनने आणलेले नवे फॅशन ट्रेंड, तिच्या आयुष्यातील चढ-उतार, तिच्या मृत्यूचं गूढ, असं बरंच काही या चित्रपटात बघायला मिळेल.