प्लास्टिक सर्जरी करणं महागात पडलं, प्रसिद्ध अभिनेत्रीचं ४३व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 06:15 PM2023-09-02T18:15:20+5:302023-09-02T18:16:26+5:30
प्रसिद्ध अभिनेत्रीने प्लास्टिक सर्जरीमुळे गमावला जीव, ४३व्या वर्षी निधन
प्लास्टिक सर्जरीमुळे अर्जेंटिनाची सुप्रसिद्ध अभिनेत्री सिल्विना लुना हिने जीव गमावला आहे. ती ४३ वर्षांची होती. काही वर्षांपूर्वी सिल्विनाने केली प्लास्टिक सर्जरी तिच्या जीवावर बेतली. आजारी असल्यामुळे सिल्विनावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर तिची झुंज संपली आणि गुरुवारी(३१ ऑगस्ट) तिचा मृत्यू झाला. सिल्विनाच्या कुटुंबीयांनी तिच्या निधनाची बातमी दिली आहे.
२०११ मध्ये सिल्विनाने प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर तिला अनेक शारीरिक समस्या उद्भवल्या होत्या. चुकीच्या प्लास्टिक सर्जरीमुळे तिला किडनीचा त्रासही जाणवू लागला होता. तिला किडनी ट्रान्सप्लांटची आवश्यकता होती. आठवड्यातून तीन वेळा सिल्विनाला किडनी डायलिसीससाठी रुग्णालयात जावं लागायचं. गेल्या काही दिवसांत प्रकृती खालावल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण, प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी व्हेंटिलेटर काढण्याची परवानगी डॉक्टरांना दिली होती.
सिल्विना लुना ही लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल होती. तिने अनेक टीव्ही शोमध्येही काम केलं होतं. प्लास्टिक सर्जरीमुळे ती चर्चेतही आली होती. तिने ‘ग्रॅन हार्मोनो २’, ‘सेलिब्रिटी स्प्लॅश’ आणि ‘डिवानी कोमोडिया’ या शोमध्ये काम केलं होतं. कलाविश्वातील अनेक कलाकार सौंदर्य खुलवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतात. याच प्लास्टिक सर्जरीचा आधार घेणं सिल्विनाच्या जीवावर बेतलं. एप्रिल महिन्यात मॉडेल क्रिस्टीना एश्टनचं प्लास्टिक सर्जरीमुळे निधन झालं होतं. हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियनसारखं दिसण्याच्या नादात क्रिस्टीनायाने जीव गमावला होता.