Avatar: The Way of Water Movie Review : कसा आहे जेम्स कॅमरूनचा ‘अवतार 2’? सिनेमा बघण्याआधी वाचा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: December 15, 2022 02:54 PM2022-12-15T14:54:00+5:302022-12-15T14:55:24+5:30

Avatar: The Way of Water Movie Review : मागच्या भागात पँडोरामध्ये मानवाला मौल्यवान खजिना मिळाला होता. या भागातील कथानक १० वर्षे पुढे सरकले आहे.

Avatar 2 james cameron Avatar The Way of Water movie review in marathi | Avatar: The Way of Water Movie Review : कसा आहे जेम्स कॅमरूनचा ‘अवतार 2’? सिनेमा बघण्याआधी वाचा रिव्ह्यू

Avatar: The Way of Water Movie Review : कसा आहे जेम्स कॅमरूनचा ‘अवतार 2’? सिनेमा बघण्याआधी वाचा रिव्ह्यू

googlenewsNext

दर्जा: ****(चार स्टार्स)
कलाकार : सॅम वर्थिंगटन, जो सल्डाना, सिगरनी वीवर, स्टीफन लँग, केट विन्सलेट, सीसीएच पाउंडर, जेमी फ्लॅटर्स, ब्रिटन डाल्टन, क्लो कोलमन, ट्रिनिटी जो-ली ब्लिस, बेली बास
लेखक : जेम्स कॅमेरून, रिक जफा, अमांडा सिल्वर, जोश फ्रीडमॅन, शेन सलेरनो
दिग्दर्शक: जेम्स कॅमेरून
निर्माता: जेम्स कॅमेरून, जॉन लँड्यू
शैली : सायन्स फिक्शन
कालावधी : ३ तास १२ मिनिटे
...........................

Avatar: The Way of Water Movie Review : ६८ वर्षीय लेखक, निर्माते, दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार’नं पुन्हा रसिकांवर गारूड केलं आहे. या चित्रपटात त्यांनी पाणी आणि पाण्याखालील विश्वाची मानवी जीवनाशी सांगड घातली आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर माणूस कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो हा विचार यात आहे. मानवी कल्पनाशक्तीच्या पलीकडे एका वेगळ्याच विश्वात नेणारा हा चित्रपट पाहणं एक विलक्षण अनुभव आहे. अद्भूत संकल्पना, अफलातून सादरीकरण, मनमोहक व्हिएफएक्स, उत्कंठावर्धक पटकथा, अर्थपूर्ण संवाद, रिअल साऊंड इफेक्टस, नेत्रदीपक दृश्ये, सहजसुंदर अभिनय आणि उल्लेखनीय दिग्दर्शनाचा अद्भुत संगम यात अनुभवायला मिळतो.

कथानक : मागच्या भागात पँडोरामध्ये मानवाला मौल्यवान खजिना मिळाला होता. या भागातील कथानक १० वर्षे पुढे सरकले आहे. पृथ्वी मानवाच्या राहण्यायोग्य नसल्यानं नवीन ग्रहाचा शोध सुरू आहे. पँडोरामध्ये नावी समुदायातील जॅक सली आणि त्याची प्रेमिका नेतिरी चार मुलांसोबत आनंदानं रहात आहेत. यात दोन मुले, एक सख्खी मुलगी, एक दत्तक मुलगी आणि माणसाचा मुलगा स्पायडरही आहे. त्यांच्या सुखी कुटुंबाला कोणाची तरी नजर लागते. पँडोरातील लोकांना स्काय पीपल म्हणणारे पृथ्वीवरील लोक मृत कर्नल माईल्सच्या आठवणी व डीएनएतून अवतरलेल्या कर्नल क्वारिचला सलीचा सूड घेण्याच्या मोहिमेवर पाठवतात. सलीच्या मुलांवर हल्ला करून तो स्पायडरला ओलीस ठेवतो. त्यानंतर सली काय करतो ते पुढे पहायला मिळतं.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची पटकथा दमदार असून, वेगवेगळे पैलू उलगडत सादर करण्यात आल्याने उत्सुकता वाढवते. काही संवाद जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवणारे आहेत. स्वत:च्याही अगोदर कुटुंब, कुटुंबाच्याही अगोदर समाज आणि समाजाच्याही अगोदर देश ही शिकवण यातही आहे. समाजाला वाचवण्यासाठी सली कुटुंबाच्या आनंदाचा त्याग करून नव्या प्रवासाला निघतो. मानवाचं प्राण्यांसोबतचं नातं यात अधिक दृढ करण्यात आलं आहे. व्हेल माशाच्या मेंदूतील अनमोल द्रवासाठी मानव कशा प्रकारे त्यांची कत्तल करतो हे देखील यात आहे. पडद्यावर दिसतो तितका हा प्रवास मुळीच सोपा नाही. यामागे खूप मोठी मेहनत असल्याचं चित्रपट पाहताना जाणवतं. मध्यंतरापूर्वीचा भाग व्यक्तिरेखांची ओळख करून देण्यात गेल्यानं थोडा लांबला आहे. इथे संकलनात कात्री चालवून लांबी करणं गरजेचं होतं. मध्यंतरानंतर खऱ्या अर्थानं चित्रपट खिळवून ठेवतो. तांत्रिकदृष्ट्याही हा चित्रपट अफलातून आहे. एक अविश्वसनीय दुनिया विश्वसनीय वाटावी या पद्धतीनं सादर करण्यात आली आहे. यात दिग्दर्शकांचं मोठं यश आहे. व्हिएफएक्समध्ये पाण्याखाली दाखवण्यात आलेला रेडीयम इफेक्ट छान झाला आहे. धडाकेबाज साऊंड इफेक्ट थिएटर हादरवून टाकतो, पण कानाला जराही त्रास होत नाही. पाण्याच्या संपर्कात राहणाऱ्या व्यक्तींची बोटं आणि शेपटी वेगळी दाखवण्याचा विचारही अनोखा आहे. चित्रपटाचा खूप मोठा भाग व्हिएफएक्सनं व्यापलेला असला तरी सर्वच कलाकारांनी आपापल्या कॅरेक्टरला अचूक न्याय दिला आहे. सर्वच व्यक्तिरेखा सुरेखरीत्या रंगवल्या असून, त्या अनुषंगाने सादरही केल्या गेल्या आहेत.

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, साऊंड, ३डी इफेक्ट्स, व्हिएफएक्स
नकारात्मक बाजू : लांबी वाढल्याने मध्यंतरापूर्वी चित्रपटाची मंदावलेली गती, संकलन
थोडक्यात : भविष्यातील सिनेमाचा हा अद्भूत अवतार जरी महागडा असला तरी प्रत्येकानं एकदा तरी अनुभवायला हवा.

Web Title: Avatar 2 james cameron Avatar The Way of Water movie review in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.