जेम्स बॉन्डच्या भूमिकेत पुन्हा एकदा डॅनिएल क्रेगच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 12:16 PM2018-08-31T12:16:28+5:302018-08-31T12:19:13+5:30
१९६२ पासून जगभरातील सिनेरसिकांचा लाडका हिरो जेम्स बॉन्ड हा सिक्रेट एजेंट पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.
१९६२ पासून जगभरातील सिनेरसिकांचा लाडका हिरो जेम्स बॉन्ड हा सिक्रेट एजेंट पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. पडद्यावर आपल्यासमोरील सर्व समस्यांवर मात करणाऱ्या या बॉन्डला मात्र पडद्यावर येण्यापूर्वीच अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. जेम्स बॉन्डच्या आगामी सिनेमाची तयारी गेल्या वर्षापासूनच सुरू झाली होती. बॉन्ड म्हणून डॅनिएल क्रेग पुन्हा सिद्ध झाला होता, पण तेवढ्यात या सिनेमाचे नियोजित दिग्दर्शक डॅनी बोएल यांनी सिनेमा दिग्दर्शित करण्यास नकार दिला आणि प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर बॉन्डच्या रोलमधून डॅनिएल क्रेगच्या ऐवजी इदरिस एल्बा या अश्वेत नायकाला घेतले जाण्याचीही चर्चा सुरू होती. असे झाले असते तर बॉन्ड साकारणारा इदरिस हा पहिला अश्वेत हिरो ठरला असता.मात्र, स्वतः इदरिस एल्बानेच ही अफवा खोडून काढली आहे.
डॅनिएल क्रेगने आतापर्यंत पाच वेळा बॉन्ड साकारला आहे. त्याला या सिनेमासाठी ५० दशलक्ष पौंड म्हणजे ४५० कोटी रुपये इतके भरभक्कम मानधन दिले गेले आहे. त्यामुळे त्याला वगळून आपल्याला बॉन्ड साकारायला दिले जाऊ शकणार नाही, असे तो म्हणाला. 'यार्दी इन लंडन' या आपल्या सिनेमाच्या प्रीमिअर प्रसंगी त्याने आपल्याबाबतची शक्यताच फेटाळली. बॉन्डचा रोल आतापर्यंत सहा कलाकारांनी साकारला आहे. त्यापैकी रॉजर मूर यांनी सर्वाधिक सात वेळा बॉन्ड साकारला आहे.
'बॉन्ड २५' असे नवीन सिनेमाचे नाव आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये या सिनेमाचे शुटिंग सुरू होणार आणि पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये सिनेमा रिलीज करायचा असे नियोजन होते. मात्र आता डायरेक्टरच प्रोजेक्ट सोडून गेल्यामुळे पुढचा प्रवासच अवघड बनला आहे. अर्थात नवीन डायरेक्टरकडे ही जबाबदारी सोपवली जाईल आणि नियोजित वेळापत्रकाप्रमाणे बॉन्ड रिलीज होईल. डॅलिएल क्रेगचा नवीन हिरोईनबरोबरचा रोमान्स, कारचा पाठलाग, घडाळ्यामधील कॅमेरे, उपग्रहांद्वारे हेरगिरी आणि चित्तथरारक स्टंटचा आस्वाद प्रेक्षकांना अगदी पुरेपूर मिळणार आहे.