‘ऑस्कर’ जिंकणे नाही सोपे! खर्च करावा लागतो पाण्यासारखा पैसा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 04:08 PM2020-02-07T16:08:07+5:302020-02-07T16:09:06+5:30
ऑस्कर जिंकणे जितके प्रतिष्ठेचे मानले जाते, तितकीच हा पुरस्कार जिंकण्याची प्रक्रिया जटील व खर्चिक आहे.
संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा येत्या 9 फेब्रुवारीला होत आहेत. साहजिकच जगभरातील सिनेप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. भारताकडून पाठवला गेलेला ‘गली बॉय’ हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून कधीच बाद झालाय. ऑस्कर जिंकणे जितके प्रतिष्ठेचे मानले जाते, तितकीच हा पुरस्कार जिंकण्याची प्रक्रिया जटील व खर्चिक आहे. आज त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
इंडस्ट्रीतील जाणकारांचे मानाल तर अतिशय काटेकोर असा मार्केटींग प्लान आणि तितकेच जबरदस्त प्रमोशन कॅम्पेन याद्वारे कुठल्याही चित्रपटाला या प्रक्रियेत लाभ मिळतो. ऑस्करमध्ये एन्ट्रीचा खर्च सुमारे 15 ते 20 लाखांपासून अनेक कोटींपर्यंत असू शकतो. फक्त ऑस्करमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी हा पैसा खर्च करावा लागतो. ऑस्कर जिंकण्यासाठी प्रत्येक चित्रपटाला अनेक दिव्यातून लावे लागते.
होय, सर्वप्रथम लॉस एंजिल्समध्ये ऑक्टोबरपासून ठाण मांडून आपला कॅम्प लावावा लागतो. याठिकाणी किमान फेब्रुवारीपर्यंत तरी राहावे लागते. यादरम्यान अनेक मेकर्स अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सच्या जवळपास खोली व ऑडिटोरियम भाड्याने घेण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करताना दिसतात. याठिकाणी अधिकाधिक लोकांनी आपला चित्रपट पाहावा, यासाठी मेकर्स प्रयत्न करतात. हा प्रमोशनचा भाग ऑस्कर प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.
ऑस्कर जिंकण्याच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे, योग्य पब्लिसिटी टीम निवडणे. अनेकदा टॉप पब्लिसिटी टीम तुमचा चित्रपट प्रमोट करण्यासाठी 10 कोटींपर्यंतही रक्कम मागू शकतात. तुमच्या चित्रपटाची प्रेस आणि प्रेक्षकांमध्ये अधिकाधिक चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी या टीमची असते. तिथल्या प्रेस सर्किटबद्दल सखोल माहिती असलेल्या जाणकारांची टीम निवडणे यासाठी गरजेचे असते.