हॉलिवूडमध्ये काम बंद आंदोलन; दोन महिन्यांपासून लेखक संपावर, नेमकं कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 03:14 PM2023-06-22T15:14:04+5:302023-06-22T15:15:19+5:30
Hollywood Writers Strike: सूमारे एक हजार लेखक संपावर गेल्यामुळे अनेक चित्रपट-मालिकांचे शूटिंग बंद करण्यात आली आहे.
Hollywood Writers Strike: फिल्म स्टूडिओसोबत नवीन करार, नोकरीची सुरक्षा आणि पगाराची हमी, या मागण्यांसाठी अमेरिकेत गेल्या 50 दिवसांपासून सूमारे एक हजार हॉलिवूड लेखकांचे आंदोलन सुरू आहे. हे सर्व आंदोलक लेखक लॉस एंजेलिसमध्ये रैली काढून प्रोडक्शन हाऊसचा निषेध करत आहेत.
बुधवारी रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका (WGA) ने एक मोठा मोर्चा काढला. यावेळी त्यांना योग्य कराराच्या मागणीसाठी इतर हॉलिवूड यूनियन्सचाही पाठिंबा मिळाला आहे. ते म्हणाले की, आम्हाला अशा अभिनेत्यांचाही पाठिंबा मिळाला आहे, ज्यांना आपल्या करारात बदल करुन हवा आहे. याशिवाय, हॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या लेबर्सचाही या आंदोलनाला पाठिंबा आहे.
A day to remember! 5,000+ marched the streets of Los Angeles in support of the #WGAStrike. We are so proud ✊ pic.twitter.com/h4nGpv38PJ
— Writers Guild of America West (@WGAWest) June 22, 2023
‘आमच्याशिवाय त्यांचे काम होणार नाही'
रॅली संपल्यानंतर गिल्ड बोर्ड आणि बातचीत समितीचे सदस्य अॅडम कोनोवर म्हणाले की, “या आंदोलनात आम्ही सर्वजण सोबत आहोत. आम्ही एक लढाई लढत आहोत. लेखकामुळेच गोष्ट तयार होते, आम्ही पात्र बनवतो, त्यांचे संवाद लिहितो. आमच्या लिखानामुळे लोकांना तुमचे काम आवडते. या कॉरपोरेटच्या लालची दुनियेत आम्हाला एक पक्की नोकरी हवी आहे. या लढाईत आम्ही जिंकू, कारण त्यांना आमची गरज आहे.''
दोन महिन्यांपासून आंदोलन
हॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या शेकडो लेखकांच्या कराराची मुदत 1 मे रोजी संपली आणि दुसऱ्या दिवसापासून सर्वांनी संप सुरू केला. त्यानंतर दिवसेंदिवस विरोध वाढत असल्याने अनेक प्रॉडक्शन हाऊस बंद करण्यात आली आहेत. मालिकांचे बजेट वाढत आहे, पण त्यात काम करणाऱ्या लेखकांच्या पगारात सातत्याने कपात केली जात असल्याचा आरोप लेखक संघटनेने केला आहे.