कसा झाला होता 'फ्रेंड्स' फेम अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृत्यू?, ऑटोप्सी रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 03:58 PM2023-12-16T15:58:45+5:302023-12-16T15:59:13+5:30
Mathew Perry : अत्यंत लोकप्रिय शो 'फ्रेंड्स' स्टार मॅथ्यू पेरीचे ऑक्टोबरमध्ये निधन झाले. त्याच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला. आता अभिनेत्याच्या मृत्यूचे धक्कादायक कारण समोर आले आहे.
अत्यंत लोकप्रिय शो 'फ्रेंड्स' स्टार मॅथ्यू पेरी(Mathew Perry)चे ऑक्टोबरमध्ये निधन झाले. त्याच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला. आता अभिनेत्याच्या मृत्यूचे धक्कादायक कारण समोर आले आहे. मॅथ्यूच्या मृत्यूचे खरे कारण त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आले आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या शवविच्छेदन रिपोर्टनुसार फ्रेंड्स स्टार मॅथ्यू पेरीचा पॉवरफुल केटामाइनच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू झाला. मॅथ्यू पेरी ऑक्टोबरमध्ये त्याच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यालाही रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लॉस अँजेलिस काउंटी मेडिकल एक्झामिनरचा अहवाल ५४ वर्षीय पेरीच्या मृत्यूच्या सुमारे सात आठवड्यांनंतर आला आहे.'मॅथ्यू पेरीच्या आकस्मिक मृत्यूचं कारण केटामाइनचा अतिवापर आहे. याशिवाय त्याच्या मृत्यूच्या कारणांमध्ये बुडणे, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ब्युपेनॉर्फिन इफेक्ट यांचाही समावेश आहे. केटामाइनमुळे त्याच्या हृदयाचे ठोके वाढले आणि तो बेशुद्ध पडला. त्यानंतर पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
रिपोर्टमध्ये नमूद केलेल्या साक्षीदारानुसार, पेरी डिप्रेशन आणि एंग्जाइटीसाठी केटामाइन इन्फ्युजन थेरपी घेत होता. रिपोर्टनुसार, अभिनेत्याने दोन महिने आधी धुम्रपान बंद केले होते. केटामाइनच्या सेवनाबाबत मॅथ्यूने त्याच्या पुस्तकातही लिहिले होते. दरम्यान, केटामाइन डॉक्टर सामान्यतः ऍनेस्थेटिक म्हणून वापरतात आणि मानसिक आरोग्य उपचारांसाठी देखील संशोधक याचा वापर करू शकतात.