ज्या जॉनी डेपच्या घटस्फोटाचं प्रकरण गाजतंय त्यानं 'वाराणसी'त वेटरला दिली चक्क ४९ लाखांची टिप!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 04:53 PM2022-06-07T16:53:24+5:302022-06-07T16:54:08+5:30
हॉलीवूड स्टार जॉनी डेपनं (Johnny Depp) नुकतंच 'वाराणसी' रेस्टॉरंटमध्ये तब्बल ४९ लाख रुपये खर्च केले.
हॉलीवूड स्टार जॉनी डेपनं (Johnny Depp) नुकतंच 'वाराणसी' रेस्टॉरंटमध्ये तब्बल ४९ लाख रुपये खर्च केले. आता तुम्ही म्हणाल की जॉनी डेप वाराणसीत केव्हा आला? त्याचं झालंय असं की जॉनी डेप काही भारतात आला नाही. बर्मिंघममध्ये एका रेस्टॉरंटचं नाव 'वाराणसी' असं आहे. 'पायरेट्स ऑफ द कॅरेबियन' फेम अभिनेता जॉनी डेपनं गिटारिस्ट जेफ बेक याच्यासोबत नुकतंच बर्मिंघममधील 'वाराणसी' नावाच्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये हजेरी लावली.
मिळालेल्या माहितीनुसार जॉनी डेपनं रेस्टॉरंटमध्ये जवळपास ४९ लाख रुपये खर्च केले. रेस्टॉरंटमधील करीचा दोघांनीही आनंद घेतला आणि जाता जाता वेटर्सना भरघोस टिप देखील दिली. बर्मिंघम स्थित 'वाराणसी' या इंडियन रेस्टॉरंटमध्ये जॉनी डेप आणि जेफ बेक यांनी करीसोबतच इतर भारतीय पदार्थ देखील चाखले. तसंच कॉकटेल आणि रोज शॅम्पेन देखील घेतली होती. डेली मेलच्या माहितीनुसार दोघांनी रेस्टॉरंटमध्ये ५० हजार पाऊंड म्हणजेच ४९ लाख रुपये खर्च केले.
'वाराणसी' रेस्टॉरंटनं देखील आपल्या सोशल मीडिया हँडलवर जॉनी डेप आणि जेफ बेक यांचा फोटो पोस्ट करत दोघांच्या उपस्थितीती माहिती दिली.
जॉनी डेप आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड यांच्यातील मानहानीच्या खटल्याचा नुकताच निर्णय आला आहे. २०१८ मध्ये, जॉनी डेपने द वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखाबद्दल अंबरविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. जॉनी डेपची माजी पत्नी अंबर हर्ड हिने २०१८ च्या या लेखात स्वतःला घरगुती हिंसाचाराचा बळी म्हणून उल्लेख केला होता. या प्रकरणात जॉनी डेप विजयी झाला आहे. जॉनी डेप सध्या आपल्या म्युझिकल टुअरवर आहे. या दौऱ्यादरम्यान तो जेफ बेकसोबत यूकेमध्ये अनेकदा दिसून आला आहे.