'पार्टी'त मंजिरीची अशी घेतली सर्वांनी फिरकी...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 05:19 PM2018-08-30T17:19:45+5:302018-08-30T17:21:09+5:30
खास करून चीत्रीकरणादरम्यानच्या झालेल्या धम्मालमस्तीची चर्चा चांगलीच रंगते. अशीच एक धम्माल चर्चा अभिनेत्री मंजिरी फुपालावरून 'पार्टी' सिनेमाच्या शूटदरम्यान सेटवर रंगली होती.
चित्रपटांची झगमगती दुनिया आणि खरंखुरं आयुष्य यात जमीन आस्मानाचा फरक असतो.या सोनेरी पडद्यावर अभिनय करताना अभिनेत्यांना भूमिकेनुसार स्वतःच खाजगी आयुष्य बाजूला ठेऊन वावरावं लागतं. सिनेवर्तुळातील याच घडामोडी सिनेप्रेक्षकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतात. खास करून चीत्रीकरणादरम्यानच्या झालेल्या धम्मालमस्तीची चर्चा चांगलीच रंगते. अशीच एक धम्माल चर्चा अभिनेत्री मंजिरी फुपालावरून 'पार्टी' सिनेमाच्या शूटदरम्यान सेटवर रंगली होती.
या चर्चेविषयी मंजिरी सांगते कि, 'पार्टी सिनेमाचे चित्रीकरण सुरु होते. नेहमीप्रमाणे मी सेटवर पोहोचली. त्या दिवशी एक गाणं चित्रित होणार होतं म्हणून मी तयारी करून बसली. तेवढ्यात सिनेमातील कलाकार सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे आणि रोहित हळदीकरमाझ्या जवळ आले आणि मला म्हणाले कि, तू रेडी आहेस ना ? भिऊ नकोस.असं काहीबाही बोलू लागले. काही क्षण मला कळेचना की हे सर्व असे काय बोलताय. मग त्यांनीच सागितले कि या गाण्यात तुला एक किसिंग सीन द्यायचा आहे. हे ऐकूनच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्यासाठी हा मोठा धक्का होता. कारण स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा असं काही नव्हतं. म्हणून मग मी दिग्दर्शक सचिन दरेकर यांचेकडे गेली. त्यांनी सुद्धा सांगितले की, अचानक स्क्रिप्टमध्ये बदल करावा लागला. पण तू तुझा वेळ घे, रेडी झाली कि मला सांग'.
'दिग्दर्शकाच्या अशा बोलण्याने मी खूपच हादरून गेली होती. भीतीने माझी अवस्था रडवेली झाली होती. त्याच अवस्थेत मी घरी फोन केला. झाला प्रकार घरी रडता रडता सांगितला. त्यानंतर सेटवर माझे करारपत्र आणण्यात आले, ज्यात लिहिले होते कि स्क्रिप्टमध्ये अचानक झालेले बदल आपणास मान्य करावे लागतील. आता मला तर सेटवरच रडू कोसळलं. जरा वेळ मला रडतांना पाहून सगळे मोठमोठ्याने हसू लागले. मी पुन्हा संभ्रमित झाली. काही कळण्याच्या आतच दिग्दर्शक सचिन दरेकर यांनी सांगितले कि आज आम्ही सगळ्यांनी तुझी फिरकी घायचे ठरवले होते. हे ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि गाण्याचं शुटींग पार पडलं'.
'पार्टी' सिनेमा ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. या सिनेमाची प्रस्तुती सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांनी केली असून, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात मंजिरी बरोबरच सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर आणि प्राजक्ता माळी मराठीच्या प्रसिद्ध युवा कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.