कोरोनामुळे संगीत क्षेत्रातील या दिग्गजाचे झाले निधन, चाहत्यांना बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 11:21 AM2020-03-25T11:21:10+5:302020-03-25T11:24:32+5:30
जगभरात या संगीत क्षेत्रातील दिग्गजाचे फॅन आहेत.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प राहाणार आहे.
कोरोनामुळे जगभरातील अनेकांना आजवर आपले प्राण गमवावे लागले आहेत. संगीत क्षेत्रातील एका दिग्गजाचे नुकतेच कोरोना व्हायरसने निधन झाले आहे. मनु डिबंगो हे आफ्रिकेचे असले तरी त्यांना जगभरात लोकप्रियता होती. त्यांचे कोरोनाने 24 मार्चला निधन झाले असून ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या संगीताचे अनेक फॅन्स असून त्यांची अनेक गाणी गाजली आहेत. मनु यांचे निधन पॅरिसध्ये झाले असून याची माहिती त्यांच्या म्युझिक पब्लिशर थिरी ड्युपरी यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
मनु यांच्या निधनामुळे त्यांच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला आहे. त्यांच्यावर अतिशय साधेपणाने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मनु यांनी एफ्रो-जॅजमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.