२४ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीनं घेतला अखेरचा श्वास, कुटुंबानं सांगितलेलं कारण ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:08 IST2025-04-23T16:08:02+5:302025-04-23T16:08:29+5:30
वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे.

२४ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीनं घेतला अखेरचा श्वास, कुटुंबानं सांगितलेलं कारण ऐकून बसेल धक्का
Sophie Nyweide Dies At Age 24: मनोरंजन विश्वातून पुन्हा एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. 'मॅमोथ' आणि 'नोआ'सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून झळकलेली अभिनेत्री सोफी न्यूवेईड हिचे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या मृत्यूची दुःखद बातमी चाहत्यांना दिली. या पोस्टमध्ये त्यांनी सोफीच्या मृत्यूचे कारण देखील सांगितले आहे. मात्र, हे कारण ऐकल्यानंतर आता तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
अभिनेत्रीचे निधन १४ एप्रिल रोजी झाल्याची माहिती तिच्या कुटुंबाने दिली आहे. सोफी गेल्या काही काळापासून नैराश्यग्रस्त होती. नैराश्यावर उपचार करण्यासाठी तिने स्वतःच काही औषधे खाण्यास सुरुवात केली होती. याच औषधांनी सोफीचा बळी घेतला, असा खुलासा तिच्या कुटुंबाने केला आहे. सोफीच्या अकाली निधनामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कलेच्या माध्यमातून व्यक्त केले दुःख
सोशल मीडियाच्या माध्यमातून आता चाहते सोफीला श्रद्धांजली वाहत आहेत. "सोफी अतिशय दयाळू आणि विश्वासू मुलगी होती", असे चाहते म्हणत आहेत. मात्र, तिच्या या दयाळूपणाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत काही लोकांनी तिचा छळ केला होता. अभिनेत्रीच्या कुटुंबाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगताना त्यांनी लिहिले की, "तिने गेल्या काही काळात खूप लिखाण केलंय, चित्र काढली आहेत. तिच्या या कलाकृती अभिनेत्रीच्या मनातील वेदना आणि दुःख व्यक्त करणाऱ्या आहेत. तिने तिच्या आयुष्यात काय काय दुःख झेललं हे तिने कलेच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे".
तिच्या कलाकृतींमध्ये जवळच्या लोकांनीच तिला कसा त्रास दिला याची वेदना दिसत असल्याचा दावा सोफीच्या कुटुंबाने केला आहे. मात्र, गेल्या काही काळापासून सोफीला या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करणारे तिचे डॉक्टर, कायदा अंमलबजावणी अधिकारी आणि तिचे काही जवळचे लोक यांना तिच्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर मोठा धक्का बसला.
उपचारास देत होती नकार
माझा हा संघर्ष मी स्वतः सांभाळू शकेन, असा विश्वास तिने कुटुंबाला दिला होता. तिने यावर वैद्यकीय उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिल्याचे तिच्या कुटुंबाने सांगितले.
कोण आहे सोफी न्यूवेईड?
अभिनेत्री सोफी न्यूवेईडचा जन्म ८ जुलै २००० मध्ये बर्लिंग्टन, व्हर्जिनिया येथे झाला. तिचे बालपण व्हरमाँट आणि न्यूयॉर्क शहरात गेलं. 'बेला' हा सोफीचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती टॅमी ब्लँचार्डसोबत झळकली होती. बालकलाकार म्हणून तिने १२ चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं. यामध्ये 'मार्गोट अॅट द वेडिंग', 'नोआ' यांचा समावेश आहे. 'मॅमोथ'मध्ये सोफीने गेल गार्सिया बर्नल आणि मिशेल विल्यम यांची मुलगी 'जॅकी'ची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका खूप गाजली होती.