जान्हवी कंडुला मृत्यूप्रकरणी प्रियंका चोप्राने व्यक्त केला संताप; म्हणाली - "जीवन हे जीवन असतं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 12:22 PM2023-09-18T12:22:08+5:302023-09-18T12:23:09+5:30
देसी गर्लने सिएटलमधील भारतीय विद्यार्थ्यानीच्या दुःखद मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तसेच प्रशासन आणि पोलिसांवरही जोरदार टीका केली.
प्रियांका चोप्रा ही यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असून ती आंतरराष्ट्रीय आयकॉन आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत देसी गर्लने आपले अभिनय कौशल्याचा ठसा उमटवला आहे. प्रियंका सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. सामाजिक मुद्यावर ती परखडपणे आपले मत मांडते. यासाठी चाहत्यांनी अनेकदा तिचे कौतुक केलं आहे. आता देसी गर्लने सिएटलमधील भारतीय विद्यार्थ्यानीच्या दुःखद मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तसेच प्रशासन आणि पोलिसांवरही जोरदार टीका केली.
प्रियांका चोप्रानं इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. तिने लिहलं '9 महिन्यांपूर्वी घडलेली दुःखद घटना आता समोर येत आहे. हे खूप भयानक आहे. जीवन हे जीवन आहे, त्याची किंमत कोणीही लावू शकत नाही'.
अमेरिकेत जान्हवी कंदुला या 23 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीच्या दुःखद मृत्यूने अनेकांना धक्का बसला. 23 जानेवारी रोजी विद्यार्थिनी रस्ता ओलांडत असताना तिला सिएटल पोलिसांच्या वाहनाने धडक दिली आणि यात तिचा मृत्यू झाला. यातच पोलिसांमध्ये सुरु असलेल्या संभाषणाचे व्हिडीओ व्हायरल होत असून यावेळी ते हसत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यात ऐकायला येते की, "जान्हवीच्या जीवाची काय किंमत आहे? शहर प्रशासनाने तिला काही पैसे द्यावेत. 11 हजार डॉलर्सचा एक चेक चालू शकतो..!".
कांडुलाच्या मृत्यूबद्दल अमेरिकन खासदार आणि भारतीय-अमेरिकनांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय, फरहान अख्तरनं जाह्नवीसोबत घडलेल्या वेदनादायक घटनेबाबत एक पोस्ट शेअर केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने या घटनेची त्वरीत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
जान्हवी कंदुला आंध्र प्रदेशची नागरिक होती. ती अमेरिकेत शिक्षणासाठी गेली होती. नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये ती शिकत होती. 2021 मध्ये स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम अंतर्गत बेंगळुरूहून ती अमेरिकेत शिक्षणासाठी गेली होती.