'मला भारतीय वंशाची लाज वाटायची' असं का म्हणाला 'स्लमडॉग मिलेनियर' फेम अभिनेता देव पटेल ? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 01:19 PM2024-04-11T13:19:10+5:302024-04-11T13:19:20+5:30
अभिनेता देव पटेल सध्या 'मंकी मॅन' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
ऑस्कर विजेता सिनेमा 'स्लमडॉग मिलेनियर' फेम ब्रिटिश अभिनेता देव पटेल सध्या 'मंकी मॅन' या सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनयाच्या माध्यमातून जगभर प्रसिद्धी मिळवल्यानंतर देवनं 'मंकी मॅन' या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केले आहे. यानिमित्तानं तो विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. एकेकाळी देव पटेलला भारतीय वंशाचा एक भाग असल्याची लाज वाटायची याचा खुलासा त्यानं नुकत्याच एका मुलाखतीत केला आहे.
देव पटेलचा जन्म लंडनमध्ये झालेला. लंडनमध्येच तो लहानाचा मोठा झाला. नुकतेच देव 'द केली क्लार्कसन शो'मध्ये म्हणाला, 'एक काळ असा होता जेव्हा मला माझ्या भारतीय वंशाची लाज वाटायची. जेव्हा तुम्ही ग्रेटर लंडनमध्ये शाळेत शिक्षण घेता, तेव्हा ही गोष्ट अजिबात 'कूल' वाटत नाही. मी तो भाग न दाखवण्याचा प्रयत्न करत आहे' असं देव म्हणाला. तसेच त्याचा मंकी मॅन हा चित्रपट हिंदू देवता हनुमानापासून प्रेरित असल्याचं त्यानं सांगितलं.
देव पटेल हा 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटाने जगप्रसिद्ध झाला. या चित्रपटाने 8 ऑस्कर पुरस्कार जिंकले होते. देव याच्याशिवाय या चित्रपटात फ्रीडा पिंटो, अनिल कपूर हेदेखील होते. देवला 2016 च्या लायन चित्रपटासाठी ऑस्करमध्ये नामांकन मिळाले होते. या चित्रपटात त्याने एका भारतीय मुलाची भूमिका साकारली होती. याशिवाय द लास्ट एअरबेंडर, द मॅन व्हू न्यूव इन्फीनिटी आणि हॉटेल मुंबईसह अनेक चित्रपटात त्याने काम केले आहे.