टेलर स्विफ्ट म्हणते, तू आनंदी आहेस?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 12:10 PM2023-10-20T12:10:40+5:302023-10-20T12:10:55+5:30

आपल्या आजवरच्या आयुष्यात तिच्या मार्गात चढ-उतार आले नाहीत, तिला अडचणींना सामोरं जावं लागलं नाही, संघर्ष करावा लागला नाही, असं अजिबात नाही; पण ती कायम शांत, हसतमुख आणि आनंदी राहिली, राहते. त्याचंच अनेकांना आश्चर्य वाटतं.

Taylor Swift Says, Are You Happy? | टेलर स्विफ्ट म्हणते, तू आनंदी आहेस?

टेलर स्विफ्ट म्हणते, तू आनंदी आहेस?

टेलर स्विफ्ट. अमेरिकन पॉप गायक- गीतकार, अभिनेत्री. आज ती वयाच्या पस्तिशीत आहे; पण ‘टीन सेन्सेशन’ आणि ‘टीन स्टार’चा किताब अजूनही तिच्या नावावर आहे. खूप लहानपणापासून तिनं यशाची चव चाखली; पण मुख्य म्हणजे या यशाची हवा कधीच तिच्या डोक्यात गेली नाही. ‘पाय जमिनीवर असलेली सेलिब्रिटी’ म्हणून आजही तिचं नाव घेतलं जातं. तरुण वयातच तिनं जागतिक यशाचा अनुभव घेतला आणि अविश्वसनीयरीत्या तिच्या यशाचा आलेख कायम वाढतच राहिला; पण त्याहूनही अविश्वसनीय म्हणजे तिचं सतत आनंदी असणं. 

आपल्या आजवरच्या आयुष्यात तिच्या मार्गात चढ-उतार आले नाहीत, तिला अडचणींना सामोरं जावं लागलं नाही, संघर्ष करावा लागला नाही, असं अजिबात नाही; पण ती कायम शांत, हसतमुख आणि आनंदी राहिली, राहते. त्याचंच अनेकांना आश्चर्य वाटतं.

नऊ वर्षांची असतानाच टेलरला संगीत आणि थिएटरमध्ये रुची निर्माण झाली. वयाच्या १४व्या वर्षी तर ती व्यावसायिक गीतकार बनली. गायिका बनण्याचा तिचा प्रवासही त्याच वेळी सुरू झाला. २००५मध्ये ‘बिग मशीन रेकॉर्ड्स’सह तिनं काही अल्बम्स केले आणि बघता बघात ती तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनली. ‘फियरलेस’, ‘लव स्टोरी’, ‘यू बिलॉन्ग’सारख्या तिच्या सुरुवातीच्या अल्बम्सनंही नवनवे विक्रम केले. 

आपले अल्बम्स आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं टेलर स्विफ्ट जगभर फिरली. आताही तिची ‘वर्ल्ड कॉन्सर्ट’ सुरू आहे. काही देशांमध्ये ती जाऊन आली, तर काही देशांमध्ये जाणार आहे. त्यात जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, फ्रान्स, स्वीडन, पोर्तुगाल, स्पेन, आयर्लंड, नेदरलँड्स, स्वीत्झर्लंड, इटली, जर्मनी, पोलंड, ऑस्ट्रिया... इत्यादी देशांचा समावेश आहे. 

या दौऱ्याच्या निमित्तानं जगभरात टेलर स्विफ्टची जादू पुन्हा एकदा सगळ्यांना अनुभवायला मिळते आहे. प्रत्येक ठिकाणच्या कॉन्सर्टमध्ये तरुणाईनं तिला डोक्यावर घेतलं आहे. तिच्या केवळ दर्शनासाठी आणि तिचा आवाज ऐकण्यासाठी तरुणाई वेडीपिशी झाल्याचं सगळ्या जगानं पाहिलं.. आपल्या फॅन्सचा इतका प्रतिसाद पाहिल्यावर ही हवा कोणाच्याही डोक्यात जाण्याचीच शक्यता अधिक; पण टेलर स्विफ्ट त्याला कायमच अपवाद राहिली आहे. 

याउलट कितीही यश मिळालं तरी आपले पाय कायम जमिनीवरच ठेवा आणि जगण्याचा भरपूर आनंद घ्या, असाच सल्ला ती सगळ्यांना देते. सल्ला कशाला, टेलर म्हणते, मी कधीच कोणाला सल्ला देत नाही. कारण प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं, त्याची प्राथमिकता वेगळी असते. मी स्वत:ला मात्र कायम तपासून पाहात असते. पाऊल चुकीचं पडणार नाही, याची काळजी मी घेत असते. 

टेलर म्हणते, मी माझ्यासाठी काही सूत्रं मात्र ठरवून घेतली आहेत. त्या ‘मर्यादेत’ राहण्याचाच प्रयत्न मी कायम करीत असते. पैसा मिळवणं हे कधीच माझ्या आयुष्याचं ध्येय नव्हतं. त्याऐवजी आपण आनंदी कसं राहू, यालाच मी कायम प्राधान्य देत आले आहे.  टेलरच्या मते कोणत्याही गोष्टीत ‘सक्सेस’ होणं, आनंदी राहाणं, अर्थपूर्ण आयुष्य जगणं ही तशी काही फार मोठी गोष्ट नाही. त्यासाठी अगदी छोटे-छोटे फंडे मी वापरते. आजपर्यंत मला तरी त्याचा खूप उपयोग झाला आहे.
टेलर म्हणते, शेवटी ‘सक्सेस’ म्हणजे तरी काय? प्रत्येकासाठी ही अतिशय वैयक्तिक आणि व्यक्तिगत अशी बाब आहे. याबाबतीत मी स्वत:लाच काही प्रश्न विचारते. तू किती आनंदी आहेस? तू किती यशस्वी आहेस? त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुला स्वत:ला तू किती आनंदी, यशस्वी असल्याचं फील होतं, यात या प्रश्नाचं सार दडलेलं आहे. मी स्वत:ला कायम आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत असते आणि माझ्या आयुष्याचंही तेच एकमेव ध्येय आहे.. टेलर, तू आनंदी आहेस का?.. हा प्रश्न मी कायम स्वत:ला विचारत असते आणि या प्रश्नातूनच मी आपोआप उत्तराकडे जाते... 

तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही झालेलं असो, कितीही वाईट दिवस तुम्ही अनुभवलेले असोत, लोकांशी तुम्ही कायमच प्रेमानं, आदरानं वागा, बोला. हा एक अद्भुत असा वारसा आहे. तो खाली झिरपतोच. मी कायम त्याचा अनुभव घेतला आहे. 

‘एकटेपणा’ आणि एकावेळी एकच ‘गोल’! 
टेलर स्विफ्ट म्हणते, तुम्ही जगाच्या सोबत, त्यांच्या साथीनं राहा, सहवासाचं, मैत्रीचं मोल मी जाणते; पण दिवस संपला की बऱ्याचदा मी ‘एकटी’ही राहते. कारण एकटेपणाची ताकद मला माहीत आहे. याच वेळी दिवसभरातले माझे ताण-तणाव, दडपण मी झटकून टाकते आणि मुक्त होते. पुढच्या दिवसाची ऊर्जा मला या एकटेपणातूनच मिळते. आणि आणखी एक. शेवटचं. मी कधीच फार जास्त ध्येय, गोल्स डोळ्यासमोर ठेवत नाही; पण ‘गोल’शिवायही मी राहात नाही. एक ‘गोल’ पूर्ण झाला, की दुसऱ्याकडे वळायचं. बस्स. इतकंच!..

Web Title: Taylor Swift Says, Are You Happy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.