कॉमेडीशी संबंध नसताना प्राजक्ताला कसा मिळाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो? आधी नकार दिला पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:26 PM2024-10-14T12:26:23+5:302024-10-14T12:27:06+5:30
मालिकांमध्ये दिसणारी प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ची होस्ट कशी झाली याचा इंटरेस्टिंग किस्सा आहे. 'वाह दादा वाह' ही प्राजक्ताची दाद तर भलतीच गाजली.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाने सर्वांनाच खळखळून हसवलं आहे. यातील सर्वच कलाकारांची वेगळी खासियत आहे, वेगळी ओळख आहे. प्रसाद ओक, सई ताम्हणकर या शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत आहे. तर सर्वांची लाडकी प्राजू म्हणजेच प्राजक्ता माळी शो होस्ट करते. 'वाह दादा वाह' ही प्राजक्ताची दाद तर भलतीच गाजली. पण कॉमेडी आणि प्राजक्ताचा तसा संबंध नसताना तिला हास्यजत्रेची ऑफर कशी आली याचा किस्सा तिने नुकताच सांगितला.
मालिकांमधून दिसणारी प्राजक्ता माळी (Prajakta Mali) महाराष्ट्राची हास्यजत्रेची होस्ट कशी झाली याचा इंटरेस्टिंग किस्सा आहे. 'मिरची मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, "मी झी मराठीवर 'गुड मॉर्निंग' महाराष्ट्र शो होस्ट करायचे. त्यानंतर मी काहीच होस्ट केलं नव्हतं. पण हास्यजत्रेच्या मेकर्सला वाटलं की या मुलीला विचारुया. तर त्यांनी मला फोन केला आणि मी थेट नकार दिला. रिएलिटी शो त्यातही कॉमेडी म्हणल्यावर माझा काहीच संबंध नाही. मी म्हणजे पंच पाडेन. मला सेन्स ऑफ ह्युमरचा काही गंध नाही. मला जमणार नाही. "
"नंतर मला परत दोन दिवसांनी फोन आला. ते म्हणाले की आम्ही तुझं पेमेंट वाढवतोय तू कर कारण आम्हाला तूच हवी आहेस. तेव्हा माझा मित्र बाजूला बसला होता तो म्हणाला, ' तू काही नाही म्हणतीयेस? एवढे चांगले पैसै देताएत तुला.' मी म्हणलं, 'मला नाही जमणार'. तो म्हणाला, 'हे तु केल्याशिवायच कसं काय म्हणतेस? एक शेड्युल करुन बघ नाही जमलं तर नंतर नको करु.' तो मुद्दा मला पटला की मी केल्याशिवाय मला कळणार नाही. सुरुवातीला काही एपिसोड्स माझे हातपाय थरथरायचे. कारण समोर एक तर प्रसाद ओक चुका काढायला बसले असायचे. पहिला काही दिवस कठीण होते. आज मला अशाही प्रतिक्रिया येतात की तुला हसताना बघून आम्हाला छान प्रसन्न वाटतं तेव्हा मला फार आनंद होतो."