'वॉर'ची कथा उथळ वाटली होती,पण नंतर...; सिनेमाच्या दुसऱ्या वाढदिवशी हृतिकनं सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 01:02 PM2021-10-02T13:02:05+5:302021-10-02T13:10:49+5:30
‘हिंदी सिनेमातली अॅक्शन आणि स्टंट्सची पातळी उंचावणे हा 'वॉर' सिनेमाचा हेतू होता.
सुपरस्टार हृतिक रोशनने आपल्या थरारक, मनोरंजनाने भरपूर, उत्साह निर्माण करणाऱ्या 'वॉर' या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेल्या सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकली. हा नेत्रसुखद सिनेमा भारतीय सिनेमांच्या इतिहासात ऑल- टाइम- ब्लॉकबस्टर ठरला आणि हृतिकनं परत एकदा आपल्या चार्मने तसेच श्वास रोखून धरायला लावणारे सीन्स सहजपणे करण्याच्या कौशल्यानं पूर्ण देशाला वेड लावलं.
प्रचंड हिट ठरलेल्या या सिनेमाच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त हृतिकने वॉरचं कथानक ऐकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती हे नुकतंच उघड केलं. तो म्हणाला, ‘खरंतर, मनात खूप गुंतागुंत होती. मी कथा वाचली तेव्हा त्यातल्या कोणत्याच गोष्टीबदद्ल मला उत्सुकता वाटली नाही. ती फालतू आणि वरवरची वाटली. आणि मी तेव्हा 'सुपर 30' सारखे ‘खरे’ सिनेमे करत होतो. माझी प्रतिक्रिया ऐकल्यानंतर सिद्धार्थ आणि आदी दोघांनीही माझ्या घरी धाव घेतली आणि माझ्यासाठी फक्त 5 मिनिटांत पुनर्ररचना केल्यानंतर मला तो सिनेमा ‘कळला.’ या सिनेमाकडे ‘धूम 2’सारखा मनोरंजक सिनेमा म्हणून बघ असा सल्ला आदीनं मला दिला.’
हृतिक पुढे म्हणाला, ‘मग आम्ही बसलो आणि सगळी कथा परत वाचून काढली आणि तेव्हा मला ती खूप धमाल वाटली. मला माझा मूर्खपणाही लक्षात आला. कधीकधी दिग्दर्शकाला एखादी कथा कशी मांडायची आहे समजून घेणंसुद्धा महत्त्वाचं असतं. आणि सिडबरोबर 'बँग बँग' केल्यामुळे तो काय म्हणतोय, यावर विश्वास ठेवणं सोपं होतं. मला यात एक संधी दिसली. कबीरच्या व्यक्तीरेखेतून सिनेमात वजन आणि गहिरेपणा आणण्याची, जी अशाप्रकारच्या सिनेमांतून विशेष दिसत नाही. त्या कल्पनेनं माझा उत्साह वाढला. माझ्या मते, असे ‘फार खोल नसलेले’ सिनेमे बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यात खऱ्या अर्थाने सखोल व्यक्तीरेखांचा समावेश करणं. मग मजा येते.’
हा सुपरस्टार, भारताने आजवर पाहिलेला सर्वात मोठा थरार- मनोरंजनपट बनवण्याचं श्रेय आदित्य चोप्रा आणि सिद्धार्थ आनंद यांच्या दूरदृष्टीकोनाला देतो. तो म्हणाला, ‘फिल्ममेकर्स या नात्याने सिड आनंद आणि आदी चोप्रा यांचा जबरदस्त दूरदृष्टीकोन या सिनेमाच्या यशाचे मुख्य कारण आहे असं मी ठामपणे म्हणेन. एक योगदानकर्ता या नात्याने वॉर सिनेमाचा हिस्सा होणं माझ्यासाठी खूप आनंदाचं होतं आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे मला स्वतःच्या मनाचं ऐकण्यासाठी तसंच संपूर्ण तनामनासह काम करण्याचं प्रोत्साहन मिळालं.’
हृतिकनं कायमच आपल्या कामातून स्वतःसाठी तसंच सिनेमा क्षेत्रासाठी नवनवे मापदंड प्रस्थापित केले. 'वॉर' सिनेमानंही अॅक्शन, नृत्य, व्यापकता अशा सगळ्या निकषांवर मापदंड प्रस्थापित करत अनोख्या सिनेमाची पर्वणी आपल्याला दिली. विशिष्ट प्रकारच्या सिनेमांच्या चौकटीतून बाहेर पडण्यासाठी कशाची मदत होते असं विचारल्यावर तो म्हणाला, ‘व्यक्तीशः मी साहसप्रेमी आहे आणि ते कुठेतरी माझ्या कामात तसंच मी ज्यांच्याबरोबर काम करतो, त्यांच्या स्वभावातही डोकावतं. व्यावसायिक पातळीवर मी कायमच अभिनयाकडे वेगवेगळ्या गोष्टींतून जगण्याचा मार्ग म्हणून पाहिलं आहे आणि ज्या व्यक्तीरेखा साकारायला मिळाल्या त्याबद्दल मी स्वतःला सुदैवी समजतो. माझी सिनेमांची निवड सहजपणे केलेली असते. मला निरनिराळ्या गोष्टींचा शोध घ्यायला, विविध मानसिकता, व्यक्ती आणि अनुभवांमध्ये स्वतःला बुडवून घेणं आवडतं.’
हृतिक पुढे म्हणाला, ‘कामानं एक माणूस म्हणून माझं क्षितिज विस्तारलं आहे. त्यामुळे मी सभोवतालचा आसमंत आणि त्यात असलेल्या माणसांप्रती जास्त संवेदनशील झालो आहे. प्रत्येक सिनेमानं माझ्या ‘स्वः’ ला आकार दिला आणि हा प्रवास शिकण्याचा- शिकलेलं विसरण्याचा होता व तो माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.’ अर्थात त्यात जोखीम होती आणि अज्ञात वाट तुडवणं आव्हानात्मक असू शकतं, पण त्यातच खरी मजा आहे. नव्या गोष्टी करताना माझ्या शरीरात उत्साहाची लाट सळसळते. त्यातूनच मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळत राहाते...’