‘माझी कुणाशीही स्पर्धा नाही’-अभिनेता सुबोध भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:03 PM2018-10-02T18:03:52+5:302018-10-02T18:04:22+5:30

ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांच्याच पसंतीस पडत आहे. या मालिकेतील विक्रम सरंजामेच्या भूमिकेतून सुबोधने तब्बल २ वर्षांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.

 'I am not competing with anyone' - actor Subodh Bhave | ‘माझी कुणाशीही स्पर्धा नाही’-अभिनेता सुबोध भावे

‘माझी कुणाशीही स्पर्धा नाही’-अभिनेता सुबोध भावे

googlenewsNext

-रवींद्र मोरे 

 छोटया पडद्यावर 'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांच्याच पसंतीस पडत आहे. या मालिकेतील विक्रम सरंजामेच्या भूमिकेतून सुबोधने तब्बल २ वर्षांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा आणि या मालिकेबद्दल त्यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद...

* चित्रपट आणि मालिका या दोन्ही माध्यमातून तू प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेस. २ वर्षांनी वेगळा विषय असलेल्या 'तुला पाहते रे' या मालिकेतून  छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना कास वाटतंय?
-  मी छोट्या पडद्याला कधी छोटा समजत नाही. माझ्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्याने म्हणजे टीव्ही मालिकेने झाली. माझ्यातील नटाला मोठे व्यासपीठ मिळाले आणि अभिनेता म्हणून माझी ओळख झाली. त्यामुळे टीव्हीचा माझ्या कारकिर्दीवर मोठा प्रभाव आहे. चित्रपट जगतात खूप काम असताना, टीव्ही मालिकेत काम करण्याचा तोटा काहीच नाही. मला प्रत्येक भूमिका आणि प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांनी स्वीकारले आहे. प्रेक्षक मला ‘तुला पाहते रे’ मालिकेत विक्रांत सरंजामे नामक मोठ्या उद्योगपतीच्या भूमिकेत पाहत आहेत. अनेक वषार्नंतर टीव्ही मालिकाही करतोय त्यामुळे चित्रपटाप्रमाणे टीव्ही सीरियलला मिळालेला प्रतिसाद पाहता, स्वत:ला धन्य मानतो.

* ही मालिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे तर या मालिकेविषयी आणि प्रेक्षकांचा मालिकेला मिळालेल्या प्रतिसादाविषयी काय सांगशील?
- मुळात मालिकांमध्ये काम करावं ही माझीच इच्छा होती. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये मी निलेश मयेकरांना भेटलो होतो तेव्हा चित्रपटात काम करायचा कंटाळा आला असून तुमच्याकडे मी करण्यायोग्य एखादा विषय आला तर मला सांगा मला मालिकेत काम करायचं आहे,  असं सांगितलं होतं. योगायोगाने या मालिकेची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यासाठी राजू आणि अपर्णा केतकर हे निर्माते मिळाले आणि ही मालिका प्रेक्षकांसमोर आली. मालिका प्रेक्षकांना आवडेल असा अंदाज होता पण मालिका पाहून लोक इतके भारावून जातील याची कल्पना नव्हती. कारण काम करताना मी कधीच परिणामांचा विचार नाही करत. मी फक्त काम करतो. या मालिकेचा परिणाम खरोखरच अदभूत आहे. लोक इतक्या प्रेमाने ही मालिका बघतात, विचार करतात, प्रतिक्रिया देतात हे सगळं कमाल आहे. खूप कमी वेळात या मालिकेने घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बांधून ठेवलं आहे.

 * मालिकेचा विषय अगदी वेगळा आहे त्याबद्दल काय सांगशील?
- या मालिकेचा विषयही प्रेक्षकांना वेगळा वाटतो आहे. वयाने मोठा असलेला विक्रांत आणि त्याच्यापेक्षा निम्म्या वयाची इशा यांची ही प्रेमकथा लोकांना किती पचेल अशी शंका होती. मात्र सध्या मालिकेला जो प्रतिसाद मिळतोय तो पाहता आपल्या समाजातही बदल स्वीकारले जात आहेत. आजपर्यंत ज्या प्रथा आणि समज प्रचलित होते आपल्या समाजात ते गळून पडले आहेत. याचे श्रेय हे नव्या पिढीचे असून ही नवी पिढी अधिक स्वतंत्र आणि नव्या विचारांची आहे यात दुमत नाही.

* मालिकेत तुझा लुक जरा वेगळा आहे, त्यासाठी काय मेहनत घ्यावी लागली?
- ‘लुक’ सांभाळणं ही तशी सोपी गोष्ट नाही. ‘विक्रांत सरंजामे’ च्या भूमिकेसाठी थोडे राखाडी केस ठेवले आहेत त्यावरही दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींना तसे केस आवडले तर काहीजण तसे पांढरे केस ठेवल्याबद्दल तक्रार करत आहेत. पण त्यात काय लपवायचंय? जे आहे ते आहे. दाढी तशीच्या तशी ठेवणं जरा अवघड जातं. पण मी हे सगळंच पहिल्यांदा करतोय. त्यामुळे मी सध्या फक्त मालिका करतो आहे, दुसरं कोणतंही काम हातात घेतलेलं नाही. जे काही चित्रपट केले आहेत त्याच्या प्रसिद्धीत गुंतलो आहे. आता या मालिकेच्या निमित्ताने ‘विक्रांत सरंजामे’ कसा वागेल?, कसा उभा राहील?, कसा बोलेल? लोकांपुढे कसा येईल? डोळ्यांतून कसा व्यक्त होईल?, या सगळ्याचा विचार करून ही व्यक्तिरेखा साकारायला मजा येत आहे.

* तुझ्यासाठी प्रेम आणि नातेसंबंधांची व्याख्या काय आहे?
- या पिढीच्या अगदी नातेसंबंधाच्या व्याख्याही बदललेल्या आहेत. मी जेव्हा गायत्री (ईशा - तुला पाहते रे) आणि त्या वयाच्या इतर मुलांना सांगतो की लग्नाआधी मी आणि माझी पत्नी दहा वर्ष एकमेकांच्या प्रेमात होतो. ते ऐकल्यावर आता नाही हे शक्य, असा त्यांचा सूर असतो. त्यांचे नातेसंबंधाबद्दलचे विचारही आता बदलले आहेत. मला वाटतं बदल तेव्हाच होतात जेव्हा आपण त्यांचा स्वीकार करतो. जोपर्यंत आपण बदल स्वीकारत नाही तोपर्यंत आपण त्याविरोधात टक्कर देत राहतो.

* मराठीतील सगळ्यात व्यग्र अभिनेता म्हणून तुझ्याकडे पाहिलं जातं, यावर तुझं काय म्हणणं आहे?
- ससा आणि कासव यांच्या गोष्टीतील मी कासव आहे. सावकाश पण, निश्चितपणे ध्येय गाठण्याचे मी ठरवले आहे. मी कधी स्पर्धेत नव्हतो आणि माझी कुणाशीही स्पर्धा नाही. खूप काम असले तरी मला दिलेले काम योग्य पद्धतीने आणि जबाबदारीने करायला आवडते. आजवर तेच केले आहे. एका मागून एक चित्रपट करत आहे. प्रत्येक भूमिका निष्ठेने साकारत असल्यामुळे प्रेक्षकांना आवडत आहे. भविष्यात हाच प्रयत्न असेल.
  

Web Title:  'I am not competing with anyone' - actor Subodh Bhave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.