...आणि मी फोन नंबर ब्लॉक केला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 06:30 AM2022-07-10T06:30:23+5:302022-07-10T06:31:35+5:30

"... मग काळ बदलला. विविध समारंभ आणि सोहळे पार पडू लागले आणि यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कलाकार गरजेचे वाटू लागले."

I blocked the phone number marathi actor sanjay mone shares his experience | ...आणि मी फोन नंबर ब्लॉक केला

...आणि मी फोन नंबर ब्लॉक केला

googlenewsNext

संजय मोने (अभिनेते)
पूर्वीच्या काळ, आमच्या क्षेत्रातला, फार छान होता. प्रयोग किंवा चित्रीकरण, जे काय असेल ते करायचं आणि आपापल्या घरी जायचं. काही कलाकारांना ‘आपापल्या’ घरी हा शब्दप्रयोग खटकत असेलही; पण बहुसंख्य लोक तसंच करायचे. मग काळ बदलला. विविध समारंभ आणि सोहळे पार पडू लागले आणि यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कलाकार गरजेचे वाटू लागले. त्यांच्याकडून मार्गदर्शन व्हावे असे दरडावणीयुक्त (केशरयुक्त श्रीखंडसारखं) विनंतीपर फोन यायचे. कलाकारांनी मार्गदर्शन शक्यतो करू नये किंवा ते काय मार्गदर्शन करणार असा विचार प्रवाह अनेक वर्षे जनमानसातून खळाळत होता.

त्याला नंतर समाजमाध्यमांचा (मराठीत ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो ते) भक्कम बांध घातला गेला. कलाकार गरजेची बाब झाले. हल्ली मी शक्यतो अशा समारंभांना जायचं टाळतो. पूर्वी अनेकदा बळी पडलो होतो. कारण एवढंच आपली ओळख करून देणारा किंवा देणारी आपलं असं काही वर्णन करतात की ते ऐकून आपण नेमके असे आहोत की काय? असा प्रश्न पडतो. कारण नम्रपणा आणि शांत स्वभाव ही माझी कधीच बलस्थानं नव्हती. ती त्यांना कुठे दिसतात देव जाणे. तर एका समारंभाला मी गेलो होतो. एका लॉजवर तात्पुरती विश्रांती घेण्याची सोय केली होती. तिसऱ्या मजल्यावर...तिथे एक फलक होता.

‘येथे दुचाकी किंवा कितीही चाकी वाहने उभी करू नयेत.’ मी हे का? आणि इथे का? हे विचारायचा मोह टाळला. चहा आणि पाणी आलं. बरोबर का माहीत नाही, पण भाजलेले पापड होते. इतर मंडळी तृप्त चेहऱ्याने कुर्रमकुर्र करत पापड खात होती. चहा आणि पापडवर जोरदार आग्रह चालू होता. नाइलाजाने मी एक तुकडा आणि एक घोट घेतला. पुढे कार्यक्रम सुरू झाला आणि संपला. माझ्या हातात एक कार्ड देण्यात आलं.

‘हे घ्या. वाटेत आपल्याच एकच उपाहारगृह आहे. तिथे जेवून घ्या. आम्हाला उलटा फेरा नको. आणि पैसे देऊ नका हां!’ मी निघालो. काही वेळाने ते ठिकाण आलं. बंद होतं. भक्कम कुलूप लागलेलं. मी पुढे निघालो आणि जेवून घेतलं; पण कुतूहल होतं, उपाहारगृह बंद का? आणि मला का सांगितलं? मी फोन लावला. ‘साहेब! जरा चूक झाली. मालकांच्या चिरंजीवांनी सोन्याची अंगठी गिळली. ती काढायला गेलेत सगळे. म्हणून बंद’ ‘बरं झालं ताबडतोब गेलात डॉक्टरकडे. चार दिवसांनी सोन्याचा भाव पडला असता तर तुमच्या त्या मालकांचं केवढं नुकसान झालं असतं!’ ‘बघा साहेब! अशी समजूतदार माणसं पाहिजेत समाजात. बरं! जेवणाचे पैसे किती झाले सांगा. घरी पाठवून देतो.’ मी फोन ठेवला आणि नंबर ब्लॉक करून टाकला.

Web Title: I blocked the phone number marathi actor sanjay mone shares his experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.