"मी मावशी झालेय! होऊ दे खर्च...", तेजस्विनी पंडीतने चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 12:03 PM2024-11-01T12:03:57+5:302024-11-01T12:05:13+5:30
Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नुकताच तिचं दिग्दर्शन असलेला येक नंबर हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता तिने सोशल मीडियावर आणखी एक गुडन्यूज दिली आहे. ही खूशखबर म्हणजे ती मावशी झाली आहे. तिने फोटो शेअर करत याबद्दल सांगितले आहे.
तेजस्विनी पंडीतने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, माझ्यासाठीची सगळ्यात ‘मोठी’, सगळ्यात ‘खास’ आणि आयुष्यभराची ‘दिवाळी भेट’ माझ्या बहिणीने आणि दाजींने मला दिली आहे. आमच्या घरात ‘लक्ष्मी’ आली! अनेक वर्ष ह्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्वच आसुसलेले होतो. माझ्या माणसांच्या आयुष्यातला १४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला.
तिने पुढे म्हटले की, त्या हॉस्पिटलच्या फेऱ्या, तिथली धावपळ, अचानक उद्भवलेले अडथळे या सगळ्यात आजूबाजूला सणाचे वातावरण आहे हे विसरायला झालं होतं पण या सगळ्यावर मात करत आमचे दिवाळीचे क्षणच नव्हे तर आयुष्य देखील या ‘कन्यारत्नाने’ उजळून टाकले! आमच्या कुटुंबाची “कथा” सुफळ संपूर्ण म्हणुया ? ही दिवाळी माझ्यासाठी एकदम खास आहे, मी मावशी झालेय! होऊ दे खर्च. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ! शुभ दीपावली ! शुभं भवतु
होतोय शुभेच्छांचा वर्षाव
तेजस्विनी पंडीतच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत कलाकार अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री सायली पाटीलने लिहिले किती गोड. मृणाल दुसानिसने अभिनंदन केलंय. अभिनेता धैर्य घोलपने लिहिले, सुख कळले. अनेकांनी आई वडील, आजींसोबत मावशीचंही अभिनंदन केलंय.