‘मी भविष्य... भविष्यावर सोडलेय’
By Admin | Published: March 1, 2017 02:30 AM2017-03-01T02:30:50+5:302017-03-01T16:22:12+5:30
लंडनमधून फायनान्समध्ये मास्टर डिग्री मिळविलेला परमसिंगला कोणत्याही मोठ्या कंपनीत सहज नोकरी मिळाली असती.
-वीरेंद्रकुमार जोगी
मुंबईत जन्मलेल्या व वाढलेल्या आणि लंडनमधून फायनान्समध्ये मास्टर डिग्री मिळविलेला परमसिंगला कोणत्याही मोठ्या कंपनीत सहज नोकरी मिळाली असती. कॉर्पोरेट जगातील नोकरीची आशा न बाळगता अभिनयात आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. चॅनल व्ही वरील ‘साड्डा हक्क’ या कार्यक्रमातून आपला अभिनयाचा प्रवास सुरू करणारा परमसिंग ‘गुलाम’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतो आहे. त्याने आपल्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. आपल्या कामावर विश्वास ठेवणाऱ्या परमने आपले भविष्य भविष्यावर सोडल्याचा प्रत्यय सीएनएक्सशी साधलेल्या संवादातून आला.
तू लंडनमधून फायनान्स या विषयात शिक्षण पूर्ण केले आहेस, मात्र तुला अभिनेता व्हावे, असे का वाटले?
टॉम कू्रझचा मी ‘मिशन इम्पॉसिबल-२’ हा चित्रपट पाहिला. तो चित्रपट बघितल्यावरच मी चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कॉलेजमध्ये असताना मी बऱ्याच नाटकांत कामे केली होती आणि नंतर मी अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले. मला वयाच्या २५व्या वर्षी माझी पहिली मालिका मिळाली आणि त्यानंतर मी मागे वळून बघितलंच नाही. रोज सकाळी उठल्यावर आज मला सर्वोत्तम अभिनय करायचा आहे, हा निश्चय करतो.
‘गुलाम’ या मालिकेत तुझी भूमिका कोणती?
मी यात रंगीलाची भूमिका साकारणार असून, तो भीमा आणि वीर यांचा गुलाम आहे. रंगीलाला स्वत:चं मत नाही आणि मालकाच्या आज्ञेचं तंतोतंत पालन हेच त्याच्या जीवनाचं ध्येय आहे. तो एक सिंह आहे, परंतु असा एक सिंह ज्याचा पाशवीपणा मालकाच्या नियंत्रणाखाली आहे. अपहरण, खून किंवा दुसरा कोणताही अपराध नि:संकोचपणे करतो. पण तत्त्वांचा संबंध येतो, तिथे रंगीला अजूनही जंगलाचा राजा आहे. त्याने अपराध केले असतीलही, परंतु तो मनाने दुष्ट नाही. महिलांसाठी त्याच्या मनात आदराची भावना आहे.
या मालिकेसाठी तू फार मेहनत घेतली असल्याचे सांगण्यात येते? काय काय करावे लागले?
रंगीलाची खरी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला ‘सेगवे’चा वापर कसा करायचा आणि बंदूक कशी चालवायची, हे शिकावे लागले. आतापर्यंत मी चार्मिंग व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याविरुद्ध ही भूमिका आहे. रंगीला भीतिदायक आहे, आपलं काम आणि कर्तव्य यांच्याआड येणाऱ्या कोणालाही कसलीही दयामाया तो दाखवीत नाही. या भूमिकेसाठी मला सर्वांत आधी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणे शिकावे लागले. स्टंट डायरेक्टर अमर यांनी शिकविलेल्या स्टेप्स मला कामी पडल्या. शूटिंगदरम्यान मी थोडा जखमी झालो. तसंच मी काही अभिनयाचे धडेही घेतले. तसंच मी घोडेस्वारीही शिकलो.
सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्यांना अनेक टीकांचा सामना करावा लागतो, याचा अनुभव आला आहे का?
आपल्या समाजात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याप्रकारे ते वागत असतात. आता काही दिवसांपूर्वी असहिष्णुतेचा मुद्दा चर्चेत होता. त्यानंतर विमुद्रीकरणाचा (नोटाबंदी) विषय समोर आला. त्यावर आता टीका केली जात आहे. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. टीका करणारे कमी नाहीत. काँग्रेस सत्तेत असताना त्यावर टीका करणारे लोक होतेच, आता मोदी सत्तेवर आहेत. त्यांच्यावरही टीका केली जाते. मी सोशल मीडियापासून दूर असल्याने मला याचा प्रत्यय आला नाही. मी माझं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य स्वतंत्र ठेवण्यावर भर देतो. मी कधी जेवतो, कधी व्यायाम करतो यासारखी माहिती मला लोकांना द्यायची नाही. लोकांनी माझे काम लक्षात ठेवावे, हे मला महत्त्वाचे वाटते.
‘साड्डा हक’मधील तुझी सहअभिनेत्री हर्षिता कौरबरोबर तुझं नाव जोडलं जातं. तिच्यासोबत तुझं नातं काय, त्याचे भविष्य काय असेल?
आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. माझी हर्षिताबरोबर रिलेशनशिप आहे, अशी बातमी माझी मुलाखत घेतल्यावर प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर मला त्या बातमीची सत्यता हर्षिताला समजावून सांगावी लागली होती. आता मला पुन्हा अशा भानगडीत पडायचे नाही. हर्षिता माझी बेस्ट फ्रेंड आहे. याहून जर कोणते मोठे नाते असेल तर तुम्हीच ठरवा. आमच्या नात्याचे काय भविष्य आहे ते भविष्यात कळेलच.
चित्रपटात भूमिका साकारण्याची इच्छा आहे का? त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत?
होय, चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे, मात्र सध्या माझी प्रायोरिटी माझ्या हाती असलेले काम आहे. यातून जर ब्रेक मिळाला तर मी निश्चितच चित्रपटात काम करेन. मला माझ्यापेक्षा वेगळ्या भूमिका साकारायला आवडते. गुलाम अशीच भूमिका आहे. तो मी नाही, पण ती भूमिका मी साकारतो आहे. अशाच वेगळ्या प्रकारच्या भूमिकांना माझे प्राधान्य राहणार आहे.