...असं वाटतं कालच Indian Idol च्या स्टेजवर परफॉर्म करत होतो, अभिजीत सावंतची भावूक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 12:26 PM2022-03-22T12:26:47+5:302022-03-22T12:28:15+5:30
अभिजीत सावंत हा Indian Idol या रिअॅलिटी शो च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता.
छोट्या पडद्यावर सर्वांच्या पसंतीचा ठरलेला शो म्हणजे इंडियन आयडल. इंडियन आयडल (Indian Idol) या शो चे आतापर्यंत अनेक सीझन आले. परंतु या शो चा पहिला सीझन सर्वांच्याच लक्षात असेल. या रिअॅलिटी शो मुळे अनेक गायकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. इंडियन आयडलच्या पहिल्या सीझनचा विजेता ठरलेला तो म्हणजे मराठमोळा अभिजीत सावंत. यानंतर त्याच्या यशाचा आलेख चढताच राहिला. त्यानं नुकतंच आपल्या कारकीर्दीची १७ वर्षे पूर्ण केली. यानिमित्त त्यानं आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत सावंतनं त्याचं प्रसिद्ध झालेलं गाणं 'मोहब्बते लुटाऊंगा' हेदेखील बॅकग्राऊंडला लावलं आहे. तसंच इंडियनच्या आयडलच्या पहिल्या सीझनपासून ते आतापर्यंतचा त्याचा प्रवास हा त्यानं फोटोंच्या माध्यमातून दाखवला आहे. तसंच त्यानं आपल्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत.
"वेळ लवकर निघून जाते असं म्हणतात ते अगदी खरं आहे. कारण इंडियन आयडलच्या ग्रँड फिनालेच्या स्टेजवर मी अगदी कालच परफॉर्म करत होतो असं वाटतंय. ज्यांनी माझ्या प्रवासात आजपर्यंत साथ दिली त्यांचे खुप आभार आणि सर्वांना खुप प्रेम," असं कॅप्शन त्यानं व्हिडीओसोबत दिलं आहे.
इंडियन आयडलचा पहिला विजेता बनल्यानंतर अभिजीत सावंतचा सोलो अल्बम आपका अभिजीत सावंत २००५ साली रिलीज झाला होता. या अल्बममधील गाण्यांना खूप पसंती मिळाली होती. त्याच्या चाहत्यांसाठी हा अल्बम मोठी ट्रीट होती. अभिजीत सावंतने आशिक बनाया आपने या चित्रपटासाठी प्लेबॅक सिंगिंग केले होते. या चित्रपटात त्याने मरजावं मिटजावां हे गाणे गायले होते. २००७ साली अभिजीत सावंतचा जुनून हा अल्बम रिलीज झाला होता. अभिजीत सावंत २००८ साली जो जीता वही सुपरस्टारमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये रिएलिटी शोचे वेगवेगळे सिंगिंग शोजचे विजेते आणि रनर अप्स यांच्यात स्पर्धा करण्यात आली होती. अभिजीत सावंत पहिला रनरअप ठरला होता.