सुनीलच्या खेळाची भुरळ पडायची अन् चेंडू हातून सुटायचा; अशोक सराफ यांनी जागवल्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 10:29 IST2025-04-13T10:27:03+5:302025-04-13T10:29:20+5:30
Ashok Saraf: वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमात अभिनेते अशोक सराफ यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

सुनीलच्या खेळाची भुरळ पडायची अन् चेंडू हातून सुटायचा; अशोक सराफ यांनी जागवल्या आठवणी
मुंबई : क्रिकेटर सुनील गावसकर माझा बालपणापासूनचा मित्र. ‘गुरुदक्षिणा’ या नाटकात त्याने कृष्ण आणि मी बलराम साकारला होता. नंतर आमचे मार्ग बदलले. तो क्रिकेटमध्ये गेला आणि मी अभिनय करत राहिलो. सुनील बॅटिंग करत असताना फिल्डिंग करणे कठीण असायचे. त्याच्या खेळाची भुरळ एवढी असायची की फिल्डिंग करताना चेंडू जवळून निघून जायचा पण भान नसायचे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांनी बालपणातील सुनील गावस्कर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दादर येथील अमर हिंद मंडळातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष दत्ता सावंत, विश्वस्त सुभाष सराफ, विश्वस्त अरुण देशपांडे, विश्वस्त दीपक पडते, उपाध्यक्ष राजीव जोशी उपस्थित होते. नेहा खरे, राजीव जोशी यांनी सराफ यांची मुलाखत घेतली.
स्लॅपस्टिक कॉमेडी मीच आणली
अशोक सराफ म्हणाले की, नाटकामध्ये सर्वप्रथम स्लॅपस्टिक कॉमेडी मीच आणली. १९८५ मध्ये ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकात आणली. त्यापूर्वी स्लॅपस्टिक कॉमेडी कोणी सादर केली नव्हती. ॲक्शन फार्ससुद्धा मीच सर्वप्रथम केला असेही ते म्हणाले.
विजया मेहतांनी मला आणि नाना पाटेकर यांना परस्परविरोधी स्वभावाच्या भूमिका दिल्या होत्या. हमीदाबाईची कोठी या नाटकात लुख्खादादा साकारला होता. त्यानंतर राम राम गंगाराम या सिनेमात म्हमद्या खाटीक साकारला होता. तो पाहून खाटीक मंडळींनी माझा अनोखा सत्कार केला होता.