"खूप मोठ्ठं घर घेणार...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेनं सांगितलं त्याच्या घराच्या स्वप्नाबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 08:33 PM2024-01-20T20:33:53+5:302024-01-20T20:34:22+5:30
Maharashtrachi Hasyajatra fame Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात लोकप्रिय झाला आहे. आजही गौरव मोरे आरे परिसरातील फिल्टर पाड्यात राहतो. नुकतेच त्याने एका मुलाखतीत त्याला पवईतील हिरानंदानी येथे घर घ्यायचे स्वप्न असल्याचे सांगितले.
स्वतःच्या हक्काचे घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. नुकतेच मराठी सिनेइंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी मुंबईत स्वतःचे घर घेतले आहे. त्यात काहींना म्हाडाच्या घराची लॉटरी लागली तर काहींनी इतर ठिकाणी घेतले आहे. यात अक्षय केळकर, पृथ्वीक प्रताप, ऋतुजा बागवे, अश्विनी महांगडे, सई ताम्हणकर अशा बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे. दरम्यान आता महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या शोमधून घराघरात पोहचलेला फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणजेच सर्वांचा लाडका विनोदवीर गौरव मोरे (Gaurav More) याने एका मुलाखतीत त्याच्या घराच्या स्वप्नाबद्दल सांगितले आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात लोकप्रिय झाला आहे. आजही गौरव मोरे गोरेगावच्या आरे परिसरातील फिल्टर पाड्यात राहतो. नुकतेच त्याने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्याला पवईतील हिरानंदानी येथे घर घ्यायचे स्वप्न असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, मला स्वतःचं घर घ्यायचे आहे. मी खूप मोठ्ठं घर घेणार आहे. माझे ठरले आहे. तेही पवई हिरानंदानीमध्ये घ्यायचे आहे.
हे माझे स्वप्न आहे...
तो पुढे म्हणाला की, बालपणी मी हिरानंदानी गार्डनमध्ये खेळायला जायचो. तिथे रंगबेरंगी मासे असायचे ते आम्ही बघायला जायचो. तेव्हा तिथे गगनचुंबी इमारती पाहून खूप भारी वाटायचं. आता ते आणखी विकसित झाले आहे. तिथे घर असावे हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे. वरच्या मजल्यावर राहून घरातून पवई पाहायचे, माझे स्वप्न आहे आणि हे स्वप्न मी लवकरच पूर्ण करणार आहे.
वर्कफ्रंट..
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून नावारुपाला आलेला गौरव मोरे नुकताच बॉईज ४मध्ये पाहायला मिळाला. लवकरच तो एका हिंदी चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. ‘सांगी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात अभिनेता शरिब हाशमी आणि विद्या माळवदे यांची प्रमुख भूमिका आहे.