Alia Bhatt : माझे चित्रपट आवडत नसतील तर पाहू नका...! करिना कपूर पाठोपाठ आलिया भटही भडकली...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 04:14 PM2022-08-23T16:14:53+5:302022-08-23T16:16:26+5:30
Alia Bhatt To Trollers : आलिया एक गुणी अभिनेत्री आहे, यात वाद नाही. पण जेव्हा केव्हा तिचं नाव घेतल्या जातं, तेव्हा तेव्हा घराणेशाहीचा टॅग तिला लावला जातो. आता या ट्रोलिंग विषयावर आलिया पुन्हा एकदा व्यक्त झाली आहे...
आलिया भट (Alia Bhatt ) सध्या यशाच्या शिखरावर आहे. 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमे दणादण आपटत असताना आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हिट ठरला. तिचा नुकताच ओटीटीवर रिलीज झालेला ‘डार्लिंग’ हा सिनेमाही प्रेक्षकांना आवडला. आलिया एक गुणी अभिनेत्री आहे, यात वाद नाही. पण जेव्हा केव्हा तिचं नाव घेतल्या जातं, तेव्हा तेव्हा घराणेशाहीचा टॅग तिला लावला जातो. यावरून नेपोटिझमवरून तिला ट्रोल केल्या जातं. आता या ट्रोलिंग विषयावर आलिया पुन्हा एकदा व्यक्त झाली आहे. पण हो, हे करताना करिना कपूरने जी चूक केली, तिचं चूक आलिया करून बसली...
काय म्हणाली आलिया?
स्टारकिड असल्यामुळे आलियाला अजूनही ट्रोल केल्या जातं. याबद्दल विचारलं असता ती म्हणाली, ‘मला वाटतं माझे चित्रपट हेच नेपोटिझमवरच्या ट्रोलिंगला दिलेलं सर्वात चांगलं उत्तर आहे. त्यामुळे मी ट्रोलिंग हा विषय कधीच मनावर घेतला नाही. माझा विश्वास आहे की, मी माझ्या कामातून आणि माझ्या चित्रपटातूनच हा संपूर्ण वाद संपवू शकते. त्यामुळे प्रतिक्रिया देऊ नका, वाईट वाटून घेऊ नका. साहजिकच मला या गोष्टींचं वाईट वाटतं. पण ज्या कामानं मला प्रेम व सन्मान दिला, त्या कामासाठी मला मोजावी लागलेली ही छोटीशी किंमत आहे, असं मी मानते. मी गंगूबाई काठियावाडी सारखा सिनेमा दिला आणि त्या यशाचा आनंद मी उपभोगला. एखादा सुपरफ्लॉप सिनेमा देईपर्यंत तरी मी आनंदी आहे. लोकांच्या ट्रोलिंगला मी बोलून उत्तर देऊ इच्छित नाही. किती दिवस मी आरडाओरडा करून स्वत:चा बचाव करत राहणार? तुम्हाला मी आवडत नसल्यास, माझे चित्रपट पाहू नका. मी काही करू शकत नाही. शेवटी लोक काही ना काही बोलत राहणारच. मी फक्त माझ्या कामातून स्वत:ला सिद्ध करू शकते आणि मी तेच करणार. कदाचित मी जे काही मिळवलंय ते मी डिजर्व करते, हे मी यातून सिद्ध करू शकेल. आज ना उद्या लोकांना हे कळेलच’
हे एक वाक्य पडणार महागात?
काही दिवसांपूर्वी करिना कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आमचे सिनेमे पाहायचे नसतील तर पाहू नका. तुम्हाला कुणीही बळजबरी केलेली नाही, असं करिना या व्हिडीओत म्हणाली होती. नेमका करिनाचा ‘लाल सिंग चड्ढा’ रिलीज व्हायच्या तोंडावर करिनाचा हा जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि यावरून करिनाच्या ‘लाल सिंग चड्ढा’ बायकॉट करण्याची मागणी नेटकºयांनी केली होती. आलिया सुद्धा ट्रोलर्सला उत्तर देताना असंच काही बोलली. मी आवडत नसेल तर माझे सिनेमे बघू नका, असं ती म्हणाली. लवकरच आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होतोय. अशात आलियाला या बोलण्यावर नेटकरी कसे रिअॅक्ट होतात, ते बघूच.