मैं वापस आऊंगा
By Admin | Published: October 21, 2016 03:46 AM2016-10-21T03:46:23+5:302016-10-21T03:46:23+5:30
‘तुम बिन’, ‘दस’, ‘गुलाब गँग’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे अनुभव सिन्हा ‘तुम बिन 2’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी लवकरच घेऊन येत आहेत. अनुभव सिन्हा यांनी
‘तुम बिन’, ‘दस’, ‘गुलाब गँग’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे अनुभव सिन्हा ‘तुम बिन 2’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी लवकरच घेऊन येत आहेत. अनुभव सिन्हा यांनी त्यांचा छोट्या पडद्यावरील प्रवास तसेच
‘तुम बिन 2’ याविषयी लोकमत सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...
तुम बिन या चित्रपटानंतर तुम बिन 2 हा चित्रपट बनवण्यासाठी इतकी वर्षं का लागली?
- तुम बिन हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर इतका गाजला नसल्याने हा चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात आहे हे मला माहीतच नव्हते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन-तीन वर्षांनंतर हा चित्रपट टिव्हीवर दाखवायला सुरुवात केली. त्यावेळी प्रेक्षकांना तो खूप आवडला. मला भेटल्यावर अनेकजण या चित्रपटाचे कौतुक करत असत. मी 2010मध्ये ट्विटर अकाऊंट सुरू केले. ट्विटरवर तर सगळे मला तुम बिन 2बद्दलच विचारत होते. त्यामुळे २०११-१२ ला मी आणि भुषण कुमार यांनी या चित्रपटाच्या सिक्वलचा विचार केला. पण माज्याकडे कथा नसल्याने मी थांबलो होतो.
चित्रपटांचे सिक्वल येण्याचे सध्या फॅडच आले आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
- २०१० नंतर चित्रपटाचे अनेक सिक्वल आपल्याला पाहायला मिळाले. प्रेक्षकांना एखादा चित्रपट आवडला की, त्याचा सिक्वल यावा अशी त्यांची इच्छा असते आणि ते आपल्या आवडत्या चित्रपटाचे सिक्वल पाहायला आवर्जून चित्रपटगृहात जातात. काही सिक्वलमध्ये कथा या तशाच असतात तर काहींमध्ये खूप वेगळ्या असतात. तुम बिन 2 ची कथा तर तुम बिनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये साम्य म्हणजे या दोन्ही चित्रपटांमध्ये एक प्रेमकथा मी दाखवली आणि दुसरे म्हणजे दोन्ही चित्रपटातील मुख्य पात्रांची नावे ही तीच आहेत. तसेच संगीत आणि नवोदित चेहरे हा तुम बिनचा युएसपी मी तुम बिन 2मध्येदेखील जपण्याचा प्रयत्न केला आहे.
नवोदित कलाकारांसोबत काम करणे आणि प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करणे यात तुम्हाला काय फरक जाणवतो?
- मी माझ्या अनेक चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. तसेच माज्या अनेक चित्रपट, मालिकांमध्ये मी नवोदित चेहऱ्यांना संधी दिली आहे. खरे तर नवोदित कलाकार आणि प्रस्थापित कलाकार या दोघांसोबत काम करण्याचे काही तोटे आणि फायदे असतात. नवोदित कलाकारांना चित्रीकरणाच्या तांत्रिक गोष्टी, काम करतानाची शिस्त सगळ्या गोष्टी समजावून सांगायला लागतात. तर मोठ्या स्टारची एक स्वत:ची इमेज असते. कोणताही चित्रपट करताना त्यांच्या त्या इमेजला धक्का बसू नये याची काळजी घ्यावी लागते. तसेच नवोदित कलाकारांसोबत चित्रपटाचे प्रमोशन करणेदेखील कठीण जाते.
सी हॉक्ससारख्या प्रसिद्ध मालिकेचे तुम्ही दिग्दर्शन केले आहे. पण त्यानंतर तुम्ही छोट्या पडद्यापासून दूर का राहिलात?
- मी सी हॉक्स ही मालिका केली तेव्हाचा छोटा पडदा हा खूपच वेगळा होता. त्यावेळी खूप चांगले विषय छोट्या पडद्यावर हाताळले जात होते. पण नंतर छोट्या पडद्यावर सासू-सूनेच्या सगळ्या
मालिका आल्या. तशा प्रकारच्या
मालिका करण्यात मला कोणताही रस नव्हता. त्यामुळे मी मालिकांपासून दूरच राहिलो. पण 24सारखी मालिका
छोट्या पडद्यावर आल्यानंतर छोटा पडदा बदलला असल्याचे मला जाणवले.
एखादी चांगली कथा असल्यास पुढील काळात मालिकेचे दिग्दर्शन करायला मला नक्कीच आवडेल.
- prajakta.chitnis@lokmat.com