इमेज चेंज जरूरी है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2016 05:29 AM2016-07-17T05:29:17+5:302016-07-17T05:29:17+5:30

‘कोंबडी पळाली’ या गाण्यात थिरकलेल्या क्रांती रेडकरने तिच्या अभिनयाद्वारे स्वत:ला सिद्ध केले आहे. तिने ‘आयटम गर्ल’ची तिची इमेज बदलली असून, एक चांगली अभिनेत्री म्हणून

Image change is necessary | इमेज चेंज जरूरी है

इमेज चेंज जरूरी है

googlenewsNext

‘कोंबडी पळाली’ या गाण्यात थिरकलेल्या क्रांती रेडकरने तिच्या अभिनयाद्वारे स्वत:ला सिद्ध केले आहे. तिने ‘आयटम गर्ल’ची तिची इमेज बदलली असून, एक चांगली अभिनेत्री म्हणून तिच्याकडे आज पाहिले जात आहे. क्रांतीने या नव्या इनिंगबद्दल ‘ सीएनएक्स’शी दिलखुलास गप्पा मारल्या....

‘कोंबडी पळाली’ या गाण्यातील क्रांती आणि आजची क्रांती यामध्ये खूपच फरक आहे. आज तुझी इमेजच पूर्णपणे बदललेली आहे. ही इमेज तू ठरवून बदललीस का?
 ‘कोंबडी पळाली’ या गाण्याने मला प्रसिद्धी, पैसा सगळे काही मिळवून दिले. त्यामुळे हे गाणे माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असणार आहे. पण या गाण्यानंतर माझ्यावर ‘आयटम गर्ल’चा शिक्का बसल्याचे माझ्या लक्षात आले. मला सगळीकडे या गाण्यावर परफॉर्मन्स करायलाच बोलावले जात असे. तसेच मला भूमिकाही त्याचप्रकारच्या आॅफर होत होत्या. मी चांगली अभिनेत्री आहे याचा कोणी विचारच करत नव्हते. त्यामुळे मी त्या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला. मी भूमिका खूपच चोखंदळपणे निवडल्या. तसेच स्वत: दिग्दर्शन केले. मी साकारलेल्या या वेगळ्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या. तसेच मी दिग्दर्शित करत असलेल्या ‘काकण’ या चित्रपटाचे लोकांनी कौतुक केले. यामुळेच माझी इमेज बदलायला मदत झाली. आज मी ‘आयटम गर्ल’ न राहाता चांगली अभिनेत्री, एक चांगली सूत्रसंचालक म्हणून ओळखली जात आहे याचा मला आनंद आहे.

‘काकण’ चित्रपटानंतर दिग्दर्शनाचा काही विचार केला आहेस का?
 अभिनय करताना तुमची जितकी दमछाक होत नाही, त्यापेक्षा कित्येत पटीने दिग्दर्शन करताना होते. त्यामुळे दीड-दोन वर्ष तरी मी दिग्दर्शनाचा विचार केलेला नाही. पण मी सध्या काही पटकथांवर काम करत आहे. माझा पुढचा सिनेमा हा माझ्या पहिल्या सिनेमापेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे. या चित्रपटाची भाषा जागतिक असावी असे माझे म्हणणे आहे. तसेच नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा माझा विचार सुरू आहे.

‘काकण’ चित्रपटातही तू काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. नव्यांना तू नेहमीच प्रोत्साहन देत असते. तू त्यांच्यासाठी काही वर्कशॉपही चालवतेस, त्याविषयी काही सांग?
4 आपल्याकडे प्रचंड टायलेंटेड लोक आहेत. पण त्यांना योग्य मार्ग दाखवला जात नाही. मी कोकणात ‘कोकण कला केंद्रा’मार्फत या क्षेत्रात येण्यास इच्छुक असलेल्या मंडळींसाठी काही वर्कशॉप चालवते. त्यांना त्यात अभिनयाचे धडे तर देते. पण त्याचसोबत शूटिंगसाठी किती वेळ लागतो, कोणत्या भूमिकेसाठी किती पैसे मिळतात या सगळ्या गोष्टीदेखील त्यांना सांगते. या सगळ्यांचा त्यांच्या भविष्यासाठी उपयोग होईल असे मला वाटते.

‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ या तुझ्या चित्रपटातील भूमिकेचे सध्या प्रचंड कौतुक होत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळीच ‘क्रांती’ पाहायला मिळत आहे अशा प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा तुझा अनुभव कसा होता?

या चित्रीकरणादरम्यान मला सुबोधकडून खूप काही शिकता आले. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव माझ्यासाठी खूपच वेगळा होता. कारण या चित्रपटात मी ट्रक चालवला आहे, बुडणाऱ्या मुलीला वाचवले आहे. या सगळ्या गोष्टींचे चित्रीकरण करणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. मला कार चालवता येते. पण कार चालवणे आणि ट्रक चालवणे यात खूप फरक आहे. ट्रक चालवण्यासाठी मला खास प्रशिक्षण देण्यात आले होते. पण तरीही मी ट्रक चालवताना खूप घाबरले होते. मी घाबरली आहे हे प्रेक्षकांना माझ्या अभिनयातून कळता कामा नये ही गोष्ट मला चित्रीकरणाच्यावेळी सतत लक्षात ठेवावी लागत होती.

तू चित्रपटात नृत्यच नाही करायचे असे आता ठरवले आहेस का?
4 नृत्यावर माझे प्रचंड प्रेम आहे त्यामुळे असा मी विचारही करू शकत नाही. सध्या मी सोनिया परचुरे यांच्याकडे कथ्थकचे धडे गिरवत आहे. पुढील तीन वर्षांत मी कथ्थकमध्ये विषारद होईल. चित्रपटात मला शास्त्रीय नृत्य करायला नक्कीच आवडेल. एवढेच नव्हे तर भविष्यात कथ्थकचे कार्यक्रम करण्याचीही माझी इच्छा आहे.

तू आता गायनाकडेही वळलेली आहे. चित्रपटात गाणे गायचा विचार कसा केलास?
 ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ या चित्रपटात गाण्यासाठी मला वैशाली सामंतने विचारले होते. मला फोनवर तिने काही गाणी गायला सांगितली आणि लगेचच फोन ठेवला. वैशाली काही आपल्याला पुन्हा फोन करणार नाही. आपली संधी गेली असे त्यावेळी मला वाटले होते. पण तिने मला थोड्याच वेळात फोन करून या गाण्याची चाल ऐकवली आणि हे गाणे मी गाणार असल्याचे सांगितले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगला तर खूप मजा आली. कारण ठराविक वेळात गाणे रेकॉर्डिंग करून आम्हाला कोल्हापूरला निघायचे होते. काही केल्या गाणे चांगले होत नव्हते. पण शेवटी सगळे जुळून आले आणि मस्त गाणे रकॉर्ड झाले. पण हे गाणे गायल्यानंतर गायिका बनणे सोपे नसते हे मला कळलेले आहे.

prajakta.chitnis@lokmat.com

Web Title: Image change is necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.