लव्ह आज कल २ नंतर इम्तियाज अलीच्या 'या' चित्रपटाचा प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो दुसरा भाग
By प्राजक्ता चिटणीस | Published: February 16, 2020 06:00 AM2020-02-16T06:00:00+5:302020-02-16T06:00:01+5:30
इम्तियाज अलीने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
इम्तियाज अलीने दिग्दर्शित केलेल्या लव्ह आज कल या चित्रपटाने काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आता ११ वर्षांनंतर इम्तियाज प्रेक्षकांसाठी लव्ह आज कल 2 हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
लव्ह आज कल या चित्रपटाचे चित्रीकरण करत असतानाच या चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्याविषयी तू विचार केला होतास का?
लव्ह आज कल या चित्रपटाचा दुसरा भाग बनवेन असा मी त्यावेळी विचार देखील केला नव्हता. पण गेल्या काही वर्षांपासून माझ्या डोक्यात सुरू होते की, लव्ह आज कल हा चित्रपट मी आजच्या काळात बनवला तर तो कसा असेल... त्यातील व्यक्तिरेखा कशा असतील... त्यामुळे एक नवीन कथा आणि व्यक्तिरेखांसोबत मी लव्ह आज कल २ बनवण्याचा विचार केला. खरं सांगू तर लव्ह आज कल या चित्रपटाच्या नावावरून देखील आमची चांगलीच चर्चा झाली होती. पण अखेरीस हेच नाव पुन्हा ठेवायचे असे आम्ही ठरवले.
या चित्रपटात सारा अली खान आणि कार्तिक आर्यनलाच घेण्याचा विचार कसा केला?
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्यासोबत मी एका वेगळ्या चित्रपटावर काम करत होतो. पण त्याचवेळी लव्ह आज कल २ या चित्रपटाची संकल्पना मला सुचली आणि या चित्रपटाच्या प्रवासाला सुरुवात झाली. साराला तर मी अनेक वर्षांपासून ओळखतो. ती सैफ अली खानसोबत अनेकवेळा लव्ह आज कलच्या चित्रीकरणाला यायची. ती त्यावेळी देखील खूपच छान दिसायची. ती कधी माझ्या चित्रपटात काम करेल असा मी त्यावेळी विचार देखील केला नव्हता. तिच्या आणि सैफच्या अभिनयात खूपच फरक आहे. पण तिच्यातील काही गुण हे सैफसारखेच असल्याचे मला अनेकवेळा जाणवते. ती खूप चांगली अभिनेत्री आहे. कार्तिकचे म्हणाल तर तो खूपच मेहनती आहे. मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी तो खूपच चांगल्याप्रकारे आत्मसात करतो.
या चित्रपटातील एक गाणे ट्रेनमधील आहे. तुझ्या अनेक चित्रपटात ट्रेनमधील एक तरी दृश्य असते याचे कारण काय?
रेल्वे मला नेहमीच आकर्षित करते. त्यामुळे माझ्या चित्रपटात रेल्वेमधील सीन हा असतो. रेल्वेतून दूरचा प्रवास करताना तुम्हाला नेहमीच एक वेगळा अनुभव येतो असे मला वाटते. परदेशातून भारतात फिरायला येणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी नेहमीच रेल्वेने ते पण सेकंड क्लासच्या डब्याने प्रवास करण्याचा सल्ला देतो. तुम्हाला या प्रवासात खूप गोष्टींचे निरीक्षण करता येते असे मला वाटते. मी आजही अनेकवेळा रेल्वेने प्रवास करतो. रेल्वेविषयी मला प्रचंड प्रेम असल्याने लव्ह आज कल २ मधील माझे सगळ्यात आवडते गाणे मी तिथेच चित्रीत केले आहे.
लव्ह आज कल या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाप्रमाणे आता तुझ्या कोणत्या चित्रपटाचा आम्हाला दुसरा भाग पाहायला मिळेल?
आजवरच्या माझ्या सगळ्या चित्रपटांच्या व्यक्तिरेखांचा संपूर्ण प्रवास मी माझ्या चित्रपटांमध्ये दाखवला आहे. त्यामुळे त्यात आणखी काही दाखवण्यासारखे शिल्लक नाही. पण रॉकस्टार या चित्रपटातील जॉर्डनची कथा मला पुढे नेता येईल असे मला अनेकवेळा वाटते. पण त्याविषयी मी अद्याप काहीही विचार केलेला नाही.