'चला हवा येऊ द्या'मध्ये अशोक सराफ यांचा अपमान; नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 10:44 AM2022-07-13T10:44:47+5:302022-07-13T10:45:32+5:30
Ashok saraf:अलिकडेच या कार्यक्रमाच्या मंचावर ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. मात्र, या कार्यक्रमात त्यांना अपमानस्पद वागणूक दिल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
छोट्या पडद्यावरील कायम चर्चेत राहणारा शो म्हणजे 'चला हवा येऊ द्या' (chala hawa yeu dya). या रिअॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबतच अनेक चित्रपटांचं प्रमोशनदेखील केलं जातं. त्यामुळे हा कार्यक्रम विविध कारणांसाठी चर्चेत असतो. कायम प्रेक्षकांची वाहवाह मिळवणाऱ्या या कार्यक्रमावर सध्या नेटकरी नाराज असून त्यांनी निलेश साबळेसह या शोच्या सगळ्या टीमला ट्रोल केलं आहे. अलिकडेच या कार्यक्रमाच्या मंचावर ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ (ashok saraf) यांनी हजेरी लावली होती. मात्र, या कार्यक्रमात त्यांना अपमानस्पद वागणूक दिल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वीच अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मराठी कलाविश्वात मोठ्या दणक्यात हा दिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे आशोक मामांचा सत्कार करण्यासाठी त्यांना चला हवा येऊ द्याच्या मंचावर बोलावण्यात आलं. मात्र, येथे मामा येताच त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली.इतकंच नाही तर अशोक सराफसारखे दिग्गज कलाकार समोर असतानाही स्वप्नील जोशी त्याच्या खुर्चीवरुन उठला नाही. त्यामुळे त्यालाही नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं.
नेमकं काय आहे प्रकरण?
अशोक सराफ 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आल्यानंतर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. मात्र, स्वप्नील जोशी त्याच्या खुर्चीवरुन साधा उठलाही नाही. हेच या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आला असता स्वप्नील ताडकन त्याच्या खुर्चीवरुन उठला आणि त्याचं स्वागत केलं. इतकंच नाही तर संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत तो स्टेजवर अनिल कपूरच्याच बाजूला बसला होता. तर, अशोक मामा आले असता स्वप्नील एकदाही त्याच्या खुर्चीवरुन उठला नाही. ही गोष्ट नेटकऱ्यांना प्रचंड खटकली आणि त्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, या संपूर्ण कार्यक्रमात अशोक सराफ यांची टिंगल टवाळी करण्यात आल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्या मराठी कलाकारांसोबत दुय्यम वागणूक आणि बॉलिवूडकरांना चांगली वागणूक देणं योग्य नाही असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.