International Women's Day: 'स्वप्न बघायला वयाचं बंधन नसतं..'; अरुंधतीने दिला स्त्रियांना मौलिक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 10:33 AM2022-03-08T10:33:57+5:302022-03-08T10:34:32+5:30
Madhurani gokhale-prabhulkar: मधुराणी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे आज तिने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देत समस्त स्त्रियांना एक मोलाचा संदेशही दिला आहे.
एक स्त्री तिच्या दैनंदिन आयुष्यात असंख्य जबाबदाऱ्या पार पाडत असते. संसाराचा गाडा ओढण्यासोबतच ती धकाधकीच्या जीवनात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावूनही काम करते. त्यामुळे घर असो वा ऑफिस ती प्रत्येक ठिकाणी स्वत:ला सिद्ध करत असते. अनेकदा ही तारेवरची कसरत असताना ती थकते, दमते मात्र तरीदेखील चेहऱ्यावर याची लवलेशही ती दाखवत नाही. विशेष म्हणजे स्त्री गृहिणी असो वा वर्किंग वूमन, ती दैनंदिन आयुष्यात घरातील प्रत्येकासाठी कायम कष्ट करत असते. त्यामुळेच त्या स्त्रीचा गौरव करण्यासाठी आज (८ मार्च) रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) साजरा केला जातो. आज सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून या दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. यात अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिनेदेखील शुभेच्छा दिल्या आहेत.
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर. या मालिकेत तिने अरुंधती ही भूमिका साकारली असून याच नावाने ती आज खासकरुन ओळखली जाते. मधुराणी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे आज तिने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देत समस्त स्त्रियांना एक मोलाचा संदेशही दिला आहे.
"मैत्रिणींनो, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आज अरुंधती महाराष्ट्रातल्या असंख्य स्त्रियांसाठी, लेकींसाठी प्रेरणा स्थान झालेय. मला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, वेगवेगळ्या वयोगटातील अनेक स्त्रिया येऊन भेटतात तेव्हा त्या प्रत्येकीला गहिवरून आलेलं मी पाहते. प्रत्येकजण अरुंधतीच्या प्रवासात कुठेतरी स्वतः ला पाहत असते. अरुंधती साकारताना, तिच्या ह्या प्रवासाने मला म्हणजे मधुराणीला बरंच काही शिकवलंय....", असं मधुराणी म्हणाली.
पुढे ती म्हणते," आणि ह्याचं श्रेय जातं ह्या अरुंधतीला उभं करणाऱ्या आमच्या सशक्त आणि प्रगल्भ लेखिका नमिता वर्तक आणि मुग्धा गोडबोल. आणि ह्या अरुंधतीला दिशा देणारे आमचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर. ह्या तिघांनी अक्षरशः बोटाला धरून प्रत्येक वळणावर मला अरुंधतीपर्यंत पोहचवलंय ... ती ह्या तिघांची आहे . मी केवळ तिचं रूप आहे."
दरम्यान, ही पोस्ट शेअर करत मधुराणीने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने स्त्रियांना स्वत:चं स्थान लक्षात घ्या, स्वत:ला महत्त्व द्या अशा कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत.