मी मुंबईत आले तेव्हा...; 18 व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभी राहिले तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 12:31 PM2022-06-26T12:31:05+5:302022-06-26T12:32:13+5:30

आतापर्यंतचं आयुष्य पुण्यातच गेल्यामुळे आणि वडिलांचा इथल्या राजकीय क्षेत्रात दबदबा असल्यामुळे कसं सगळंच सोप्पं होतं; पण मुंबई शहर हे भूलभुलैय्या आहे.

Interview of sanskruti balgude | मी मुंबईत आले तेव्हा...; 18 व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभी राहिले तेव्हा...

मी मुंबईत आले तेव्हा...; 18 व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभी राहिले तेव्हा...

googlenewsNext

 संस्कृती बालगुडे, अभिनेत्री
२०११ मध्ये मला ‘पिंजरा’ नामक दैनंदिन मालिका मिळाली आणि मला माझं महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून पुण्याहून मुंबईला स्थलांतरित व्हावं लागलं. आमचं मुंबईत कोणीच नव्हतं. मुंबईत घर शोधण्यापासून सुरुवात होती; पण माझ्या वडिलांच्या राजकीय ओळखीतून मला कांदिवली भागात एक घर मिळालं. माझी आईदेखील माझ्यासोबत राहायची; पण माझा धाकटा भाऊ त्यावेळी शाळेत असल्याने आणि त्याला आईला सोडून राहायची सवय नसल्याने ती मधूनच ३-४ दिवस परत पुण्याला जाऊन यायची. मलाही आजवर एकट्याने घरी राहायची कधीच वेळ आली नव्हती. सतत दिमतीला कोणीतरी असायचंच. पुण्याला तेव्हा आम्ही नुकतेच नव्या आणि मोठ्या घरात राहायला गेलो होतो; पण माझ्या मुंबईत येण्यामुळे मला त्या घरात फारसं राहायला न मिळाल्याची रुखरुख मनाला लागली होती.

आतापर्यंतचं आयुष्य पुण्यातच गेल्यामुळे आणि वडिलांचा इथल्या राजकीय क्षेत्रात दबदबा असल्यामुळे कसं सगळंच सोप्पं होतं; पण मुंबई शहर हे भूलभुलैय्या आहे.  इथे रोज नवी आव्हानं आहेत. रोज नवा संघर्ष आहे. मला सुरुवातीला या शहराच्या वेगाचंच दडपण यायचं. एकटेपणाची आजवर कधी सवय नसल्यामुळे दिवसभराच्या कामानंतर घरी परतल्यावर रिकामपण जाणवायचं, मग मी स्वतःला अधिकाधिक कामात बुडवून घेऊ लागले. मी स्वभावाने थोडी अंतर्मुख असल्याने आधी इथल्या फिल्मी पार्ट्यांना फारशी जात नसे. त्यामुळे मला या क्षेत्रातही फारसे मित्र-मैत्रिणी नव्हते.  मुंबईत आल्याने मला बऱ्याच गोष्टींना मुकावं लागलं.

माझं महाविद्यालयीन जीवन, माझ्या मित्र-मैत्रिणी, माझ्या खाण्याच्या आवडीनिवडी या  सगळ्यात मला कॉम्प्रमाइज करावं लागलं; पण मला त्याची  खंत अजिबातच नाही. कारण हे करिअर, हे आयुष्य माझं मी निवडलं होतं. त्याच बरोबर मला वयाच्या १८ व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवता आलं होतं. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम होती; पण मला माझं वेगळं व्यक्तिमत्त्व घडवायचं होतं जे मी फक्त मुंबईत आल्यामुळे करू शकले, याचा मला आणि माझ्या घरच्यांनाही सार्थ अभिमान आहे. काम करणाऱ्याची इच्छा असणाऱ्याला इथे भरपूर वाव आहे. मीही इथे खूप काम करते आहे आणि जेव्हा थोडा ब्रेक घ्यावा, असं वाटलं की पुण्याला पळते.  इथली माणसं, त्यांच्या खाण्याच्या सवयी सगळं वेगळं आहे. इथे माणसं सामोसा पाव खातात. मंगळवार, गुरुवार पाळतात. हे सर्व जरी असलं तरी इथे अजूनही माणुसकी जिवंत आहे, जी मी अनुभवली आहे. हे शहर प्रत्येकाला आपलं म्हणतं म्हणूनच माझं मुंबईवर अतोनात प्रेम आहे.
शब्दांकन : तुषार श्रोत्री
 

Web Title: Interview of sanskruti balgude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.