इरफान खान त्याच्या यशाचे श्रेय द्यायचा या खास व्यक्तीला, शेवटपर्यंत ही व्यक्ती राहिली त्याच्यासोबत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 01:41 PM2020-04-29T13:41:19+5:302020-04-29T13:45:02+5:30
इरफाननेच अनेक मुलाखतींमध्ये याविषयी सांगितले होते.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या इरफान खानचे नुकतेच निधन झाले. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. इरफानला केवळ भारतातच नव्हे तर जगभर फॅन फॉलोव्हिंग होते. त्याने पिकू, पान सिंग तोमर, द लंचबॉक्स यांसारख्या बॉलिवूडच्या चित्रपटात एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या. तसेच लाइफ ऑफ पाय, ज्युरॅसिक वर्ल्ड यांसारख्या हॉलिवूड चित्रपटातही तो अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. इन्फर्नो या टॉम हँक्स यांच्या चित्रपटात इरफान प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.
इरफानने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चाणक्य, भारत एक खोज, बनेगी अपनी बात, चंद्रकांता यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. त्याने त्यानंतर एक डॉक्टर की मौत, सच अ लाँग जर्नी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मकबूलमधील भूमिकेमुळे मिळाली.
इरफानने त्याच्या अभिनयाच्या जोरावर केवळ बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले होते. त्याच्या या यशाचे श्रेय तो नेहमी एका व्यक्तीला द्यायचा. त्याची पत्नी सुतापा सिकंदरमुळे त्याला हे यश मिळाले असे तो अनेक मुलाखतींमध्ये सांगायचा. इरफानने अतिशय मेहनत करून त्याचे प्रस्थ निर्माण केले होते. त्याच्या बालपणी घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. इरफानचे शिक्षण झाल्यावर तो घराची जबाबदारी सांभाळेल असे त्याच्या कुटुंबियांना वाटत होते. पण त्याला अभिनय क्षेत्रातच करियर करायचे होते. त्यामुळे त्याने कोणत्याही क्षेत्रात नोकरी न करता अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करायला सुरुवात केली. त्याचदरम्यान त्याच्या वडिलांचे निधन झाले. इरफान मानसिकदृष्ट्या खचलेला असताना त्याला एका मुलीने साथ दिली. त्याच्यासोबत तिने एक टेलिफिल्म बनवली, हीच टेलिफिल्म पाहून त्याला गोविंद निहलानी यांनी अभिनयक्षेत्रात संधी दिली. हीच मुलगी त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात त्याच्या पाठिशी उभी राहिली. ही मुलगी म्हणजेच त्याची पत्नी सुतापा.