Irrfan Khan Passed away: चटका लावणारी इरफानची एक्झिट, अकाली निधनामुळे बॉलीवूडमध्ये हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 06:30 AM2020-04-30T06:30:05+5:302020-04-30T06:30:23+5:30

वर्सोवा येथील बडा कब्रस्तानमध्ये कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Irrfan Khan Passed away, Bollywood due to his untimely demise | Irrfan Khan Passed away: चटका लावणारी इरफानची एक्झिट, अकाली निधनामुळे बॉलीवूडमध्ये हळहळ

Irrfan Khan Passed away: चटका लावणारी इरफानची एक्झिट, अकाली निधनामुळे बॉलीवूडमध्ये हळहळ

googlenewsNext

मुंबई : कसदार आणि अष्टपैलू अभिनयासाठी सुप्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते इरफान खान यांचे आज निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात बुधवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर वर्सोवा येथील बडा कब्रस्तानमध्ये कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांची पत्नी सुतापा सिकंदर, मुलगा आयान आणि बाबिल उपस्थित होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड जगतात शोककळा पसरली आहे. इरफान खान २०१८ पासून न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमरने त्रस्त होते. त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर ते पुन्हा २०१९ मध्ये भारतात परतले. त्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये दमदार पुनरागमन केले होते. मागच्या शनिवारी २५ एप्रिल रोजी त्यांच्या आईचे निधन झाले होते. लॉकडाउनमुळे त्यांनी व्हिडिओ कॉॅलच्या माध्यमातूनच आईचे अखेरचे दर्शन घेतले होते.
आतड्यांचा संसर्ग झाल्याने मंगळवारी इरफान खान यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘मकबूल’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमधून दमदार भूमिका साकारल्या. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
बॉलिवूडसोबतच त्यांनी हॉलिवूडमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला. यात ‘जुरासिक वर्ल्ड’, ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटांचा समावेश आहे. जगभरातील चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
>पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
इरफान खान यांना कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच ‘पानसिंग तोमर’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तीस वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी ५०हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.
>इरफान यांच्या निधनामुळे चित्रपट व नाट्यक्षेत्राची हानी झाली आहे. वेगवेगळ्या माध्यमांतील अभिनयाबद्दल
ते सदैव लक्षात राहतील.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
> इरफान हा जागतिक चित्रपटसृष्टीत मोठे योगदान देणारा अभिनेता होता. खूप लवकर तो आपल्याला सोडून गेला.
- अमिताभ बच्चन,
ज्येष्ठ अभिनेते

Web Title: Irrfan Khan Passed away, Bollywood due to his untimely demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.