इरफानला त्याच्या आजारपणातील काळ आठवू नये, यासाठी 'अंग्रेजी मीडियम'चे निर्माते घेतात ही काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:27 PM2019-04-17T16:27:46+5:302019-04-17T16:32:22+5:30
बराच काळ न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी सामना केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता इरफान खान भारतात परतला आहे. आता तो हिंदी मीडियम चित्रपटाचा सीक्वल अंग्रेजी मीडियमचे शूटिंग करत आहे.
बॉलिवूड अभिनेता इरफान खान नुकताच लंडनमध्ये एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजारावर उपचार घेऊन भारतात परतला आहे. सध्या तो हिंदी मीडियम चित्रपटाचा सीक्वल अंग्रेजी मीडियमचे शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमधील उदयपूरमध्ये सुरू आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
या पोस्टरमध्ये इरफान मिठाईच्या दुकानाबाहेर उभा असलेला दिसतो आहे आणि या दुकानाचे नाव आहे घसीटेराम मिष्ठान्न भंडार. हे मिठाई आणि नमकीनचे दुकान आहे.
अंग्रेजी मीडियम चित्रपटात मिठाई व्यापारी चंपकजीच्या भूमिकेत इरफान दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग करताना इरफान खान इतक्या गंभीर आजाराशी सामना करून आल्याचे जाणवतही नाही.
तसेच क्रु मेंबर्स व चित्रपट निर्माते देखील त्याच्यासमोर त्याच्या आजाराबद्दल कुणीही बोलू नये याची काळजी घेतात. सेटवर आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतात.
अंग्रेजी मीडियम चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करत असून दिग्दर्शन होमी अदाजानिया करत आहेत. या चित्रपटात इरफानसोबत दीपक डोबरियाल व राधिका मदन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या कलाकारांसोबत पंकज त्रिपाठी कॅमिओ करताना दिसणार आहे.