मार्केटिंगअभावी मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अवघड...
By Admin | Published: April 10, 2016 01:49 AM2016-04-10T01:49:36+5:302016-04-10T01:49:36+5:30
मराठी चित्रपट आज ग्लोबल झाला आहे, अन् तो सातासमुद्रापार पोहोचला असल्याची गोष्ट खरीच आहे. मराठी सिनेमाचा आशय अन् सध्या मराठी सिनेमांमध्ये येणारे विषय पाहता
मराठी चित्रपट आज ग्लोबल झाला आहे, अन् तो सातासमुद्रापार पोहोचला असल्याची गोष्ट खरीच आहे. मराठी सिनेमाचा आशय अन् सध्या मराठी सिनेमांमध्ये येणारे विषय पाहता प्रेक्षक मराठी चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये खेचले जात आहेत. गेल्या काही वर्षांत सिनेमा तांत्रिकदृष्ट्यादेखील बदलला असून अॅक्शन, मसाला अन् डोळे दीपविणारे लोकेशन्स मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहेत. मराठीची सुरू असलेली ही घोडदौड पाहता बॉलीवूडमधील अॅक्टर आणि सिंगरसुद्धा मराठी सिनेमांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. परंतु आजही मराठी चित्रपटांचे मार्के टिंग पुरेपूर होत नसल्याने चित्रपट चांगला असूनदेखील तो प्रेक्षकांपर्यंत काही वेळेस पोहोचत नाही. याचसंदर्भात सीएनएक्सने काही प्रोड्युसर, पी.आर एजन्सी अन् मार्के टिंग करणाऱ्या एजन्सीसोबत चर्चा करून मराठी सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, याचा आढावा घेतला.
चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना आकर्षित करण्यासाठी पहिल्यांदा सिनेमाचे पोस्टर आऊट करतात. त्यानंतर फक्त एखादा लूक दाखविण्यासाठी टीझर आणतात अन् मग १ ते २ मिनिटांचा ट्रेलर लाँच केला जातो. आताची स्ट्रॅटेजी पाहता चित्रपटातील गाणीदेखील एक एक करून प्रेक्षकांसमोर लाँच केली जात आहेत.
कोणते गाणे कधी रीलीज होणार याची उत्सुकता ताणली जाऊन तरुणाई तर या गाण्यांची वेड्यासारखी वाट पाहत असते. चित्रपटातील गाणे हिट झाले की बास तो चित्रपट प्रेक्षकांना आवडला म्हणूनच समजा. अशा प्रकारचा मार्के टिंग फंडा वापरून सिनेमा लोकल टू ग्लोबल करता येतो. चित्रपटाची पब्लिसिटी करताना निर्माते पी.आर. आणि मार्के टिंग या दोन गोष्टींमध्ये नेहमीच गल्लत करतात. सिनेमाचे संपूर्ण शूटिंग झाले, की ते पी.आर. एजन्सीला कॉन्टॅक्ट करून आपला सिनेमा त्यांच्या स्वाधीन करतात, अन् त्याचे मार्केटिंग करायला लावतात. पी.आर. करताना सिनेमा पाहिजे तेवढ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही तर तो मर्यादित राहतो. तर मार्केटिंग करताना त्याचा रिच वाढतो अन् चित्रपट टार्गेट आॅडियन्सपर्यंत जाण्यास मदत होते. सिनेमाची व्याप्ती वाढवायची असेल, तर त्या चित्रपटाचे अभ्यासपूर्वक मार्केटिंग करण्याची आवश्यकता असते. तुमचे प्रोडक्ट चांगले असेल तरच लोक ते विकत घेतात. असेच चित्रपटाच्या बाबतीत असते. चित्रपट चांगला असेल तरच प्रेक्षक खेचले जातात, हा सगळा खेळ फक्त तीन दिवसांचा असतो. चित्रपट शुक्रवारी लागल्यावर वीकेंडच्या पुढच्या दोनच दिवसांत त्याची कुवत समजते अन् बॉक्स आॅफिस कलेक्शनवर त्याचा लगेच परिणाम होतो. त्यामुळे चित्रपटाचा विषय चांगला असला, तरी त्याचे मार्केटिंग होणे महत्त्वाचे असते. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यापासून जर ती फिल्म मार्केटिंग व पी.आर. करण्यासाठी दिली, तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. चित्रपटाच्या सुरुवातीपासून मार्केटिंगचा माणूस त्या सिनेमाशी जोडला गेल्याने त्या फिल्मविषयी त्याला अनेक गोष्टी जवळून समजतात. चित्रपटाचे प्लस-मायनस पॉइंंट, यूएसपी एकदा कळली, की चित्रपटाचे प्रमोशन राइट वेने होऊ शकते. मार्केटिंगचा भाग यामध्ये ८० टक्के असतो, तर पी.आर. केवळ ३० टक्के. त्यामुळे निर्मात्यांनी पी.आर. करावाच परंतु जास्त कॉन्सनट्रेट मार्केटिंगवर करावे. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तो मार्केटिंग एजन्सीला देण्यात काहीच अर्थ नसतो. सिनेमा रीलीजिंगची डेट अनाऊन्स केल्यानंतर जर चित्रपट प्रमोशनसाठी घेतला, तर १ महिन्यात त्याचा प्रचार होऊ शकत नाही. तुमची फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचायची असेल, तर त्याच्या मार्केटिंगसाठी किमान ३ महिन्यांचा कालावधी तर लागतोच.
मराठी चित्रपटांना सध्या चांगले दिवस आले असून, चांगल्या आशयाचे चित्रपट येऊ लागले आहेत. असे चित्रपट हिट होतात, याची उदाहरणे आपण नटसम्राट व कट्यारच्या माध्यमातून पाहिली आहेत. निर्माते संपूर्ण पैसा चित्रीकरणावर खर्च करतात. मार्केटिंगची वेळ येते तेव्हा बजेट कमी असते आणि पैसे संपलेले असतात. त्यामुळे शूटिंग सुरू झाल्यापासूनच चित्रपटाचा पी.आर. करण्याची आवश्यकता असते. कारण आशय जर उत्तम असेल तर नक्कीच प्रेक्षक सिनेमा पाहतात. तसेच निर्मात्यांनी मराठी सिनेमामध्ये यावे व गंमत म्हणून न पाहता चित्रपटाकडे गंभीर दृष्टिकोनातून पाहावे.
- मानसी देवराय (सिबा, पी.आर. अॅण्ड मार्केटिंग)े
निर्मात्यांनी चित्रपटावर लावलेले पैसे त्यांना नफ्यामध्ये मिळावे, अशी अपेक्षा असते. त्यासाठी चित्रपटाचा टार्गेट आॅडियन्स फाइंड करणे आवश्यक असते. तसेच स्क्रिप्टवर आधारित बॅ्रँडिंग व मार्केटिंग करावे लागते. चित्रपटाची पब्लिसिटी चांगली झाली की बॉक्स आॅफिस कलेक्शन वाढते. फेस व्हॅल्यू, जॉनर, ट्रेंड या गोष्टींचा विचार करण्याची गरज असते. मार्केटिंगच्या कन्सेप्ट कुठे अन् कशा वापरायच्या हे समजले पाहिजे.
- सचिन अडसुळ (सिबा, पी.आर. अॅण्ड मार्केटिंग)
मी गेल्या १५ वर्षांपासून हिंदी-मराठी चित्रपटांच्या मार्केटिंगसाठी काम करीत आहे. यशराज बॅनर, इरॉस यांसारख्या कंपन्यांसाठी काम केले आहे. अशा वेळी मराठी चित्रपट जास्त प्रोफेशनल वाटत नाहीत. मराठी चित्रपटाचा कंटेन्ट खूप चांगला असतो, परंतु सिनेमा फसतो पब्लिसिटीमध्ये. तसेच मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाहीत. मल्टिप्लेक्समध्ये शो टाइम मिळत नाही. यासाठी चित्रपट महामंडळाने प्रयत्न करणे जरुरीचे आहे.
- रुकेश हंडा (प्रचार एंटरटेनमेंट)
निर्मात्यांनी मार्के टिंग आणि पी.आर. यातील फरक समजून घ्यायला पाहिजे. बिझनेसमॅन पैसा इन्व्हेस्ट करण्यासाठी चित्रपट बनवितात. मग संपूर्ण पैसा चित्रीकरणावरच खर्च केला जातो. पोस्ट प्रोडक्शनच्या वेळेस मग पैसा उरत नाही अन् चांगल्या विषयाच्या फिल्मदेखील पडून राहतात. आधी निर्माते चित्रपट बनवून कंपनीला विकायचे, परंतु आता तसे होत नाही. चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी निर्मात्यांनी इनिशिअल स्टेजपासूनच मार्केटिंग करण्यास सुरुवात करावी. - विनोद सातव (लीड मीडिया प्रा.लि.)