'शोले'साठी सचिन पिळगावकरांना पैशांऐवजी दिली होती ही वस्तू गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 06:01 PM2021-08-17T18:01:19+5:302021-08-17T18:01:45+5:30
'शोले'मध्ये सचिन पिळगावकर यांनी अहमदची भूमिका साकारली होती.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचा आज वाढदिवस आहे. सचिन पिळगावकर यांचा जन्म १९५७ साली मुंबईत झाला. सचिन यांनी आत्तापर्यंत शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये आणि काही टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर सचिन यांना मराठी चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
सचिन पिळगावकर यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रविंद्र नाथ टागोर यांच्या नाटकावर आधारित डाकघर या हिंदी चित्रपटात काम केले. त्यानंतर १९८२मध्ये सचिन यांनी नदिया के पार या चित्रपटात काम केले. त्यानंतर सचिन यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये मूख्य भूमिका साकारली.
बॉलिवूडचा क्लासिक चित्रपट शोलेमध्येदेखील सचिन यांनी काम केले. त्यामध्ये त्यांनी अहमदची भूमिका साकारली. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना मानधना ऐवजी फ्रिज देण्यात आला होता.
चित्रपटांव्यतिरिक्त काम करण्यासोबतच सचिन पिळगावकर यांनी मालिकांमध्ये देखील काम केले. २००६मध्ये दूरदर्शनवर प्रदर्शित झालेली मालिका ‘तू तोता मैं मैना’मध्ये काम केले. ही मालिका त्यावेळी खूप लोकप्रिय ठरली होती.
मायबाप या वडिलांनी निर्मिती केलेल्या चित्रपटातून सचिन यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत वीसहून जास्त चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी बॉलिवूडमधील राजेश खन्नांपासून अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सचिन यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले.