कलाकारावर एखाद्या भूमिकेचा शिक्का बसणे वाईट
By Admin | Published: March 25, 2017 01:03 AM2017-03-25T01:03:29+5:302017-03-25T01:03:29+5:30
उपेंद्र लिमयेने जोगवा, यल्लो यांसारख्या मराठी चित्रपटात तर पेज थ्री, चांदनी बार यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दजेर्दार भूमिका
उपेंद्र लिमयेने जोगवा, यल्लो यांसारख्या मराठी चित्रपटात तर पेज थ्री, चांदनी बार यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दजेर्दार भूमिका साकरल्या आहेत. त्याचा नगरसेवक हा चित्रपट 31 मार्चला प्रदर्शित होत आहे. त्याच्या या चित्रपटाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
‘नगरसेवक’ या नावावरून हा चित्रपट एक राजकीय असल्यासारखे वाटतं आहे. तू या चित्रपटाविषयी काय सांगशील?
- हा चित्रपट नावावरून राजकीयपट वाटत असला, तरी तो राजकीयपट नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याची खदखद या चित्रपटातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नेते आपल्या स्वार्थासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा वापर करतात, पण, त्यांचा स्वार्थ संपला की, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. असाच एक कार्यकर्ता चिडून उठतो आणि नगरसेवक या पदापर्यंत पोहोचतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. हा एक तद्दन कमर्शिअल सिनेमा आहे. या सिनेमात रोमान्स, मारामारी सगळे काही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
तू आतापर्यंत अनेक आॅफ बीट चित्रपटांमध्ये काम केले आहेस, तू कमर्शिअल सिनेमाकडे कसा वळलास?
- मी आॅफ बीट सिनेमांमध्ये काम करत असल्याने त्याच भूमिकांसाठी मला ओळखले जात असे. पण, या सगळ्यांतून बाहेर पडून मला एखादा कमर्शिअल सिनेमा करायचा होता. त्यामुळे मी नगरसेवकची निवड केली. मी याआधी देखील ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ या चित्रपटात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या समोर आलो होतो. एक कलाकार म्हणून एकाच साच्यातील भूमिका करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याची गरज आहे, असे मला वाटते. कोणत्याही भूमिकेचा शिक्का कलाकार म्हणून तुमच्यावर बसणे योग्य नाही, असे मला वाटते.
तू कित्येक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतला आहेस, अनेक वर्षे छोट्या पडद्यापासून दूर राहण्याचे कारण काय होते?
- मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक मालिकांमध्ये काम केले होते. पण, पेज ३ या चित्रपटानंतर मला अनेक चित्रपटांच्या आॅफर यायला लागल्या. हिंदी, दाक्षिणात्य अशा अनेक सिनेमांमध्ये मला काम करण्याची संधी मिळत असल्याने मी काही काळ छोट्या पडद्यापासून दूर राहण्याचे ठरवले. दरम्यानच्या काळात हिंदी, दाक्षिणात्य व मराठी चित्रपटांत मी खूप चांगल्या भूमिका साकारल्या. चित्रपटात व्यग्र असताना मला मालिकांच्या आॅफर येत होत्या. पण, मालिकांमध्ये दाखवला जाणारा बटबटीतपणा मला पटत नव्हता. त्यामुळे मी छोट्या पडद्यापासून अनेक वर्षे दूर राहिलो. पण, मी सध्या करत असलेल्या मालिकेचे कथानक मला भावल्याने मी मालिकेत काम करण्याचे ठरवले.
तू नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहेस. या तिन्ही माध्यमांमध्ये कोणते माध्यम तुला अधिक भावते?
- नाटक, चित्रपट, मालिका या तिघांमध्ये तुलना केलेलीच मला आवडत नाही. तिन्ही माध्यमं ही एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. प्रत्येक माध्यमांमध्ये कथा सांगण्याची पद्धत ही वेगळीच असते. चित्रपट अथवा नाटकात तुम्हाला कथा ही केवळ दोन ते अडीच तासांत सांगायची असते. तेच मालिकेत कथा तुम्ही विस्तारितपणे सांगू शकता. तिन्ही माध्यमांत अभिनयच करायचा असला, तरी तिन्ही माध्यमांची बलस्थाने ही वेगवेगळी आहेत.