मोठाले घर मिळाले... पण आईला गमावले.... आजही जॅकी श्रॉफला वाटते ही खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 02:53 PM2021-03-16T14:53:23+5:302021-03-16T14:58:30+5:30
जॅकी श्रॉफची आई त्याची प्रचंड लाडकी असल्याने जॅकीच्या बाजूच्याच रूममध्ये आई राहात असे. पण एका रात्री त्याच्या आईचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आईच्या निधनानंतर जॅकी श्रॉफला प्रचंड त्रास झाला होता.
जॅकी श्रॉफ हा केवळ एक खूप चांगला अभिनेताच नव्हे तर खूप चांगला व्यक्ती देखील आहे आणि त्याने आजवर हे सिद्ध देखील केले आहे. जॅकी श्रॉफच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय बेताची होती. पण त्याने आपल्या मेहनीच्या बळावर स्वतःचे बॉलिवूडमध्ये एक स्थान निर्माण केले.
जॅकीचे बालपण एका चाळीत गेले आहे. त्याने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिल्यानंतर मुंबईत मोठाले घर घेतले होते. पण या मोठ्या घरामुळे त्याच्या आईच्या शेवटच्या क्षणी तिच्यासोबत त्याला राहाता आले नाही या गोष्टीचा पश्चाताप त्याला आजही होतो. जॅकी श्रॉफच्या भावाचे वयाच्या 17 व्या वर्षी निधन झाले. भावाचा मृत्यू त्याने त्याच्या डोळ्यासमोर पाहिला होता. या घटनेला तो कधीच विसरू शकला नाही. त्याची आई त्याची सर्वस्व होती. जॅकी श्रॉफने मोठाले घर घेतल्यावर प्रत्येकाच्या रूम या वेगवेगळ्या होत्या. रूम वेगळ्या असल्याने माणसे एकमेकांपासून दूर जातात असे नेहमी जॅकी श्रॉफला वाटते.
जॅकी श्रॉफची आई त्याची प्रचंड लाडकी असल्याने जॅकीच्या बाजूच्याच रूममध्ये आई राहात असे. पण एका रात्री त्याच्या आईचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आईच्या निधनानंतर जॅकी श्रॉफला प्रचंड त्रास झाला होता. त्याने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. त्याने सांगितले होते की, माझ्या आईला त्रास झाला तेव्हा तिने कोणाला तरी हाक नक्कीच मारली असेन... पण वेगवेगळ्या रूम असल्याने तिचा आवाज कोणाला गेला नाही... घर मोठे मिळाले.... पण आई माझ्यापासून दुरावली.
जॅकीच्या घरची आर्थिक परिस्थिती खराब होती. त्यामुळे त्याला अकरावीत असताना शिक्षण सोडावे लागले. त्याने अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या आहेत. देवआनंद यांच्या स्वामी दादा या चित्रपटाद्वारे जॅकीने त्याच्या चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली. त्यानंतर सुभाष घई यांनी हिरो या चित्रपटात त्याला काम करण्याची संधी दिली. या चित्रपटाने जॅकी श्रॉफचे आयुष्य संपूर्णपणे बदलले.