जॅकी श्रॉफ म्हणतात ‘जय जवान, जय किसान’
By सुवर्णा जैन | Published: September 9, 2019 06:00 AM2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:00+5:30
निष्ठा माझ्यासाठी आयुष्यातील सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. काही काही गोष्टींचा क्रम ठरवणं गरजेचं असतं..
सुवर्णा जैन
बदल घडवण्यासाठी स्वतः सुरूवात करा राजकारणाची गरज काय असा प्रश्न अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी केला आहे. 'प्रस्थानम' चित्रपटातून जॅकी रसिकांच्या भेटीला येत आहे. याच निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
१. 'खलनायक', 'मिशन काश्मीर', 'एकलव्य' या चित्रपटानंतर तब्बल १२ वर्षांनी मित्र संजय दत्तसह काम करताय ? काय भावना आहेत ?
हो खरंय तब्बल बारा वर्षांनंतर मित्रासोबत काम करतोय. मला विचाराल तर १२ वर्षे म्हणजे खूप वेळ लागला. आम्ही याआधीच एकत्र काम करायला हवं होतं. कदाचित योग्य वेळ आली नव्हती. अखेर 'प्रस्थानम'च्या निमित्ताने ती संधी आलीच. मित्रासोबत काम करण्याची वेगळीच मजा असते. पुन्हा जुन्या गोष्टीत रमता आलं, आठवणींना उजाळा मिळाला. खरंच ही खूप आनंदाची बाब आहे.
२. 'प्रस्थानम' या चित्रपटाला राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यामुळे देशात बदल करायचा असेल तर तुम्ही राजकारणात प्रवेश करणार का?
प्रस्थानम हा पॉलिटिकल ड्रामा आहे. मात्र माझ्या मते बदल घडवण्यासाठी मला कोणत्याही राजकीय पक्षाची गरज नाही. कोणताही बदल करायचा असेन तर त्याची सुरुवात मी स्वतःपासून करेन, जे मी कायम करतो. त्यामुळे त्यासाठी राजकारणातच जायचं आणि मग त्या गोष्टी करायच्या या विचाराचा मी बिल्कुल नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मातीशी नातं आणि इमान ठेवून काम करेन. शेतकरी आणि जवानासाठी मी काम करेन.
३. गेली अनेक वर्षे तुम्ही चित्रपटसृष्टीत काम करत आहात. हे इतकं यश तुम्ही कसं सांभाळलं? तुम्ही काय सल्ला द्याल?
आयुष्यात कुठल्याही गोष्टीचं योग्य नियोजन करा असं मी सांगेन. आपण आज जे काही करतोय, कमावतोय त्यातील काही भाग भविष्यासाठी राखून ठेवा. कठीण काळात हीच गोष्ट तुम्हाला भविष्यात नक्कीच मदत होईल. मुंग्या तुम्ही पाहिल्या असतीलच. रांगेत चालताना त्या काही तरी गोळा करत असतात. त्यांच्यासारखे एक ध्येय तुमच्या नजरेसमोर राहू द्या. निष्ठा माझ्यासाठी आयुष्यातील सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. काही काही गोष्टींचा क्रम ठरवणं गरजेचं असतं..
४. मुलगा टायगरसह तुम्ही कधी एकत्र दिसणार अशी रसिकांना उत्सुकता लागली?
स्वतःच्या मुलासोबत काम करायला कुणाला आवडणार नाही. योग्य वेळ आली की मी आणि टायगर रुपेरी पडद्यावर झळकू. मलाही आनंदच होईल. बघू आता कसं आणि कधी जुळून येतंय सगळं.
५. टायगरचं यश आणि त्याचं स्वप्न साकार होत असलेलं पाहून तुमचा ऊर अभिमानाने भरून आला असेल…
टायगरसाठी मी खूश आहे. त्याचं एक स्वप्न साकार झालं आहे. तो त्याच्या गुरूसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. नुकतंच टायगर आणि त्याचा गुरू असलेला अभिनेता ह्रतिक रोशनची भूमिका असलेल्या 'वॉर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यांत रिअल गुरू-शिष्याची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. टायगरचं हे स्वप्न साकार झाल्याबद्दल मी खूप खूप खूश आहे.
६. तुमच्या यशाचं काय गुपित आहे? तुमच्या काय अपेक्षा आहेत?
मी कधीच कुठल्याही गोष्टीची अपेक्षा केली नव्हती. एखादी गोष्ट मिळायलाच हवी असंही माझं काहीच नव्हतं. मला खूप काही मिळावं अशीही माझी काहीच अपेक्षा नव्हती. मी एक सर्वसामान्य व्यक्ती होतो आणि आजही तसाच आहे. मी आज जो काही आहे ते माझे निकटवर्तीय आणि कुटुंबामुळे आहे. माझ्या जवळच्या लोकांवरील प्रेम, निष्ठा आणि विश्वास कायम राहावा असं मला वाटतं.