जागर स्त्रीशक्तीचा... जागर 'ती'च्या कर्तृत्वाचा
By Admin | Published: March 8, 2017 05:32 AM2017-03-08T05:32:25+5:302017-03-08T05:32:25+5:30
स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मोजत असतो, असं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं. डॉ. आंबेडकरांनी
- Suvarna Jain
स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मोजत असतो, असं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं. डॉ. आंबेडकरांनी पाहिलेल्या प्रगत समाजाचं स्वप्न आज साकार होत आहे. कारण आज असं एकही क्षेत्र नाही, ज्यात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून नाही तर त्यांच्या एक-दोन पाऊल पुढे असल्याचे पाहायला मिळते. माता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मदर तेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, लता मंगेशकर या आणि अशा कित्येक कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घेत आजच्या महिला यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करत आहेत. नारीशक्तीच्या याच यशाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन. महिलांच्या याच हक्काच्या दिनी अभिनय क्षेत्रात आपल्या कार्याने वेगळं स्थान
निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींच्या भावना जाणून घेतल्या.
स्वसंरक्षणाचे धडे मिळणे गरजेचे
महिला दिन आला की, महिलांविषयी बरंच काही उत्साहानं बोललं जातं, मतं मांडली जातात. हे सगळ्यात आधी बंद व्हायला हवं. महिलांच्या सुरक्षेवर जास्त विचार करण्यापेक्षा कृतीची गरज आहे. महिलांची फसवणूक कुठे होत असेल तर ते म्हणजे सायबर क्राइम. या गोष्टीवर आळा घातला पाहिजे. बऱ्याचदा म्हटलं जातं की महिलांनी, तरुणींनी हे करू नये, ते करू नये. रात्री उशिरा बाहेर पडू नका, छोटे कपडे घालू नका हे मुलींना सांगण्याऐवजी आधी मुलांना सांगा. विद्यार्थिनी, तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे मिळणे गरजेचे आहे. यात पालकांची भूमिकाही महत्त्वाची असते. डान्स क्लास किंवा इतर क्लाससाठी आपण पाठवतो मग सेल्फ डिफेन्ससाठी का नको? निर्भया प्रकरण म्हणा किंवा बंगळुरूमधील प्रकरण असो अजूनही महिला असुरक्षितच आहे. महिलांबाबत विचार बदलणं गरजेचं आहे. त्यामुळं महिला दिनी मतं मांडण्यापेक्षा त्यापलीकडे जाऊन काही तरी करण्याची गरज आहे.- मयुरी वाघ, (‘अस्मिता’ फेम)
समाजाने बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज
जागतिक महिला दिन जवळ आला की सोशल नेटवर्किंग साईटवर महिलांचे हक्क, महिला सशक्तीकरणाच्या गप्पा मारल्या जातात. मात्र हे सगळे त्या एका दिवसापुरतं मर्यादित असते. मात्र वर्षभर हे सारं कुठे असते. एका दिवसासाठी सेलिब्रेशन करायला काही हरकत नाही. एकविसाव्या शतकात राहतोय लोकांना कळलंच पाहिजे की जग कसं पुढे जातंय. प्रत्येक जण बदलत आहे. अगदी त्याचप्रमाणे महिलाही बदलत आहेत. स्त्रियांचे विचार, त्यांची मत पटली नाही तरी चालेल; मात्र स्त्रियांनी काय करावे, काय करू नये हे कुणी सांगू नये. आम्ही जे करतो त्यात आम्हाला आनंद मिळतो. त्यामुळे तुमचे तथाकथित विचार, सल्ले तुमच्याजवळच ठेवा. स्त्रियांवर लादण्याची काहीच आवश्यकता नाही. एखादी तरुणी किंवा महिला कोणासोबत जाते, काय करते याकडं समाजानं बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. एक मुलगी म्हणून एखादा तिच्याकडे बघतो तेव्हाच समोरच्याचा दृष्टिकोन कळतो.- मिताली मयेकर, (फ्रेशर्स)
ते प्रेम म्हणजे खरी स्त्री शक्ती!
स्त्रीशक्तीचा जागर सगळीकडे होत असतो. स्त्रिया सक्षम आहे. सगळ्याच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्यांच्यात आत्मविश्वास आहे. महिलांनी विविध क्षेत्रांत स्वत:ला आणि त्यांच्यातील क्षमतेला सिद्ध करून दाखवलं आहे. हे सगळं करत असताना मात्र सध्यस्थिती पाहता स्त्रियांनी जवळच्या लोकांचा आधार होणं जास्त गरजेचं आहे. आपले आई-वडील, सासू- सासरे, नवरा-मुलं आणि आपल्या जोडल्या गेलेल्या दोन्ही कुटुंबांचा. माझ्या मते प्रेम म्हणजेच खरी स्त्रीशक्ती.
- मृणाल दुसानीस (अस्सं सासर सुरेख बाई)
स्वत:च स्वत:च्या स्वप्नातील राजकुमार बना!
तरुणींमध्ये विशेषत: बऱ्याच वेळा एक भावना येते की अमुक एखाद्या अडचणीतून माझ्या स्वप्नातील राजकुमार वाचवेल, किंवा हा राजकुमार माझे स्वप्न पूर्ण करेल. असा कुणी राजकुमार येईल आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी, प्रश्न सोडवेल याची वाट पाहण्यापेक्षा तुम्हीच तुमच्या स्वप्नातील राजकुमार बना. मुलांकडून अवास्तव अपेक्षा बाळगण्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टी आयुष्यात मिळवू शकाल, त्या अडचणी सोडवू शकाल इतके सक्षम बना, स्वत:च्या पायावर उभे राहा, एवढंच मी सांगेन.
- मृण्मयी देशपांडे,
(कॉमेडीची बुलेट ट्रेन)