जग्गा जासूसच्या निर्मात्याला होणार 40 कोटींचा तोटा
By Admin | Published: July 17, 2017 08:30 PM2017-07-17T20:30:35+5:302017-07-17T20:49:25+5:30
कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या जग्गा जासूसला चांगली ओपनिंग मिळाली नाही.
मुंबई, दि. 17 - कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या जग्गा जासूसला चांगली ओपनिंग मिळाली नाही. दिग्दर्शक अनुराग बासूची मेहनत, रणबीर कपूरचा दमदार अभिनय आणि 120 - 130 कोटी रुपये खर्च करुनही हा चित्रपट प्रेक्षकांवर प्रभाव टाकू शकला नाही. डिस्ने इंडियाच्या रोमॅण्टिक फॅमिली ड्रामा असलेल्या जग्गा जासूसने पहिल्या तीन दिवसांत 33.17 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचा एकूण निर्मिती खर्च पाहता ही रक्कम फारच कमी ठरत आहे. कतरिना आणि रणबीरच्या केमिस्ट्रीने काही प्रेक्षकांची मनं जिंकली असली तरी डिस्ने इंडियाला 40 ते 50 कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जग्गा जासूसने पहिल्या दिवशी संथ सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 8 कोटी 57 लाख रुपयांची कमाई केली. शनिवारी आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत 30 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. शनिवारी या चित्रपटाने 11.53 कोटी तर रविवारी 19.7 कोटीची कमाई केली. ट्रेन अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन याची माहिती दिली. चित्रपटाचा बजेट पाहता ही कमाई सरासरीपेक्षाही कमी असल्याचं म्हटलं जात आहे.
आणखी वाचा
पिक्चर शुरु या निर्मिती संस्थेअंतर्गत जग्गा जासूस या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपट सुरू झाल्या क्षणापासून त्यात बरेच बदल करण्यात आले होते. स्क्रीप्ट शिवायच चित्रपटाच्या काही भागांचं चित्रीकरण करण्यात आल्यामुळे अंतिम संकलनाच्या वेळी त्यातील काही भाग वगळावा लागला होता. त्यात अभिनेता गोविंदाच्या भूमिकेवरही कात्री चालली होती. या सर्व कारणांनी रणबीरचा जग्गा जासूस बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. दरम्यान, भारतात अपयशी ठरलेल्या या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये चांगलीच सुरुवात केली आहे. या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 73 लाख (पाकिस्तानी रुपये) रुपयांची कमाई केली आहे. रणबीर आणि कतरिनाचा जग्गा जासूस 14 जुलै रोजी भारतातील 1800 पेक्षा जास्त स्क्रीन आणि परदेशातील 610 स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता.