जय श्री राम... कंगनाने चालवला बाण, रावणाचे दहन; 50 वर्षात पहिल्यांदाच महिलेला मान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 08:23 AM2023-10-25T08:23:02+5:302023-10-25T08:31:32+5:30
यंदा दसऱ्याच्या दिवशी राजधानी दिल्लीत यंदाचे रावण दहन थोडे वेगळे आणि खास झाले.
नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती तिच्या चित्रपटाचे प्रमोशनही करते. त्या अनुषंगाने ती सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत आहेत. यंदाचा दसरा कंगनासाठी एकदम खास ठरला. कारण, राजधानी दिल्लीत रावणाचे दहन करण्याचा बहुमान कंगनाला मिळाला. विशेष म्हणजे ५० वर्षात पहिल्यांदाच एका महिलेच्याहस्ते येथे रावणाचे दहन करण्यात आले. दरम्यान, उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही रावण, कुंभकरण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले.
यंदा दसऱ्याच्या दिवशी राजधानी दिल्लीत यंदाचे रावण दहन थोडे वेगळे आणि खास झाले. कारण, यावेळी रावण दहनाचा बाण अभिनेत्री कंगना राणौतच्या हाती पाहायला मिळाला. खुद्द लव कुश रामलीला समितीने कंगनाला रावण दहन सोहळ्यासाठी बोलावले होते. लाल किल्ल्यावर दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या ५० वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती, जेव्हा एखाद्या महिलेने बाण मारून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. कंगनानेही उत्साहात बाण चालवून रावणाचे दहन केले, यावेळी जय श्रीराम अशी घोषणाबाजीही केली. महिला आरक्षण विधेयकाला संसदेने मंजुरी दिल्याने समितीने हा निर्णय घेतल्याचे समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी सांगितले.
आज दिल्ली की प्रसिद्ध लव कुश राम लीला में रावण दहन करने का सौभाग्य प्राप्त हुआ ।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 24, 2023
जैसे श्री राम रावण से लड़े वैसे ही हमारे देश के सैनिक दैत्यों से भिड़ते हैं।
जय श्री राम 🚩#tejaspic.twitter.com/XSbzDy0O8Z
कंगनाला पाहण्यासाठीही मैदानावर मोठी गर्दी झाली होती. पोलिसांसह लीला समितीच्यावतीने १४० बाऊंसर कंगनाच्या आजुबाजूला तैनात करण्यात आले होते. दरम्यान, दिल्लीत फटाके फोडण्यास बंदी असल्याने ८ ट्रॅक डिजिटल डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या मदतीने आतिषबाजी करण्यात आली.
कंगनाचा तेजस चित्रपटाचे प्रदर्शन
कंगनाचा ‘तेजस’ हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. याशिवाय 'एमर्जन्सी' सिनेमा २४ नोव्हेंबरला रिलीज होणार होता. त्यासाठी, तिचे दौरे सुरू असून तेजस चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही कंगनाने आज एक विशेष दौरा केला. या दौऱ्यातील विमानप्रवासाचे फोटो कंगनाने ट्विटरवरुन शेअर केले आहेत. त्यातून तिच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येते. तेजस चित्रपटाच्या निमित्ताने प्रमोशनसाठी आज आलेल्या अनुभवातून कंगनाने स्वत:ला नशिबवान असल्याचं म्हटलंय. कारण, तेजसच्या निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भेटीचा योग जुळून आल्याचं कंगनाने सांगितले.